दुबईतील मशिदी बनणार इको-फ्रेंडली

दुबई- वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा -हास होत असल्यामुळे संपूर्ण जगामध्ये इको फ्रेंडली अर्थात पर्यावरणस्नेही वस्तू व इमारतींच्या वापराची चळवळ सुरू झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्येही याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. दुबईमध्ये नव्या मशिदी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून, या मशिदी पूर्णपणे इको-फ्रेंडली पद्धतीने बांधण्याचा निर्णय दुबई सरकारने घेतला आहे.

पहिली इको-मशीद पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाही सत्रामध्ये सुरू होणार असून, तिचे जवळपास 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. यूएईमधील सर्वच मशिदी इको-फ्रेंडली पद्धतीने बांधण्याचा आमचा विचार आहे. जेणेकरून पाणी व वीज यांची मोठया प्रमाणात बचत होण्यास मदत होईल, तसेच एअर कंडिशनरमधून बाहेर पडणारा घातक वायू कमी करण्यास मदत होणार आहे. या इको मशिदींमुळे पाण्याची 20 टक्के तर विजेची 25 टक्के बचत होणार असल्याचे तय्यब यांनी सांगितले.

दुबईतील ही पहिली इको-मशीद एक लाख पाच हजार चौरस फुटांच्या क्षेत्रफळावर बांधण्यात येणार असून तिच्यासाठी जवळपास 36 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मशिदीमध्ये स्नानासाठी लागणा-या गरम पाण्यासाठी सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा पुनर्वापरासाठी व एअर कंडिशनमधून बाहेर पडणा-या घातक वायूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.