नवी दिल्ली – वारंवार घडणार्या बलात्काराच्या घटनांमुळे बदनाम झालेले नवी दिल्ली शहर पुन्हा एकदा खुनांच्या घटनांमुळे प्रकाशात आले असून देशाच्या या राजधानीमध्ये सामान्य माणसाचे जीवन सुरक्षित राहिलेले नाही या टीकेला दुजोरा मिळाला आहे. गेल्या रविवारी दिल्ली शहरात एकाच दिवशी घडलेल्या दोन घटनांमध्ये दोघा वृद्धांसह सहा जणांची हत्या करण्यात आली. या सगळ्या हत्यांच्या घटना पूर्व दिल्लीमध्ये घडल्या.
दिल्लीत एकाच दिवसात सहा जणांचे खून
पूर्व दिल्लीतल्या विवेक विहार या बंगल्यामध्ये एकाच वेळी बंगल्याचे मालक उद्योगपती बजरंगलाल बोकाडिया (वय ६२), त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर, आचारी आणि घरकाम करणारा नोकर अशा चौघांची एकाच वेळी हत्या करण्यात आली. सकाळी ही घटना उघड झाली. बोकाडिया यांना एका खुर्चीला बांधण्यात आलेले होते आणि त्यांनी ओरडू नये म्हणून त्यांच्या तोंडात बोळा कोंबलेला होता. त्यामुळे जीव गुदमरून ते मरण पावले. त्यांच्या तिघा नोकरांना मात्र त्यांच्या गळ्यावर वार करून मारून टाकलेले दिसून आले.
पूर्व दिल्लीतल्याच लक्ष्मी नगर भागात ८५ वर्षांच्या एका महिलेचा आणि ५५ वर्षाच्या तिच्या मुलीचा खून केलेला आढळून आला. बोकाडिया यांचा खून का झाला असावा याबद्दल पोलीस अजून काही सांगत नाहीत. मात्र या वृद्ध महिलेचा आणि तिच्या मुलीचा खून मात्र मालमत्तेवरून झालेल्या भांडणातून केला असावा, असा तर्क केला जात आहे.