कैरो – इजिप्तच्या उत्तर सिनई पेनिन्सुला भागात सोमवारी सकाळी पोलिसांना घेऊन जाणा-या दोन मिनीबसवर दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात 24 पोलिस ठार झाले. दहशतवाद्यांनी घात लावून हा हल्ला केल्याचे इजिप्तच्या सुरक्षा अधिका-यांनी सांगितले. इजिप्तच्या सीमेजवळ असणा-या सिनई पेनिन्सुला भागातील राफाहीन शहरातून या बस जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला.
इजिप्तमध्ये दहशतवाद्यांकडून 24 पोलिसांची हत्या
या हल्ल्यात तीन पोलिस जखमी झाले आहेत. मोहोम्मद मोर्सी यांना इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदावरुन बडतर्फ केल्यापासून सिनाईमध्ये दररोज सुरक्षा पथकांवर असे हल्ले सुरु आहेत. मोहोम्मद मोर्सी यांच्या सुटकेसाठी मुस्लिम ब्रदरहूड समर्थक आणि इजिप्तच्या लष्करामध्ये रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. इजिप्तमध्ये गेल्या बुधवारपासून सुरु असलेल्या हिंसाचारात जवळपास एकहजार जणांचा मृत्यू झाला आहे.