नवी दिल्ली – देशाच्या आयात-निर्यात व्यापारातील तूट भरून काढण्याचा एक उपाय म्हणून केंद्र सरकारने परदेशातून आयात केल्या जाणार्या एल.सी.डी., एल.ई.डी. आणि प्लाजमा टी.व्ही.च्या आयातीवर ३६ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा वर्षांपासून अशा प्रकारचे टी.व्ही. आयात कर मुक्त होते. त्यामुळे परदेशात जाणारे बरेच लोक येताना असे टी.व्ही. आणत होते. विशेषत: सिंगापूर, मलेशिया या देशात पर्यटनासाठी जाणारे लोक या वस्तूंची आयात मोठ्या प्रमाणावर करत होते.
आता मात्र केंद्र सरकारने ही सवलत रद्द केली असून येत्या २६ तारखेपासून आणल्या जाणार्या अशा टी.व्हीं.वर ३५ टक्के आयात शुल्क आणि आयात शुल्काच्या तीन टक्के शैक्षणिक कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. एकुणात आयात केलेल्या जाणार्या टी.व्ही.च्या किंमतीच्या ३६.०५ टक्के एवढा हा कर बसतो.
आयात-निर्यात व्यापारातील तूट वाढत चालल्यामुळे भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत घट होत आहे आणि रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घटत आहे. ती किंमत सावरण्याचा उपाय म्हणून दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सोने-चांदी आणि प्लॅटिनम या मौल्यवान धातूंवरचे आयात शुल्क तिसर्यांदा वाढवून दहा टक्के केलेले आहे.