भाजपाचे लक्ष्य २७२ जागा

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीत २७२ जागा जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले असून ते साध्य करण्यासाठी मुस्लीम समाजातील २० ते २५ टक्के मते आपल्याला मिळतील यावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष, सरचिटणीस आणि संघटन सचिव यांच्या बैठकीत पक्षाचे निवडणूक मोहीम प्रमुख नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समाजातली एवढी मते आपल्याला मिळू शकतात असा दावा केला. गुजरातमध्ये तसे घडलेले आहे असे सांगतानाच त्यांनी त्यासाठी काय केले पाहिजे याचेही मार्गदर्शन केले.

मुस्लीम समाज हा एकसंध असल्याचे समजले जात असले तरी त्यांच्यात सुद्धा शिया, सुनी, बोहरा आणि अन्य असे काही भाग आहेत आणि त्या त्या मुस्लिमांच्या विशेष समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला तर हे लोक भाजपाकडे आकृष्ट होऊ शकतात. विशेषत: गरीब मुस्लिमांना पक्षाने आकृष्ट केले पाहिजे आणि कॉंग्रेसने आजपर्यंत या समाजाच्या कल्याणाची भाषा वापरली असली तरी प्रत्यक्षात त्यांची गरिबी कमी झालेली नाही हे त्यांना पटवून दिले पाहिजे, असे श्री. मोदी म्हणाले.

गुजरातमध्ये मुस्लीम मतदारांपैकी २५ टक्के मतदार भाजपाला मतदान करतात. हे गुजरातमध्ये घडते तर अन्य राज्यात का घडू शकणार नाही, असा सवाल त्यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २० उपसमित्या नेमण्यात आल्या असून त्यांना आता सक्रिय करावे लागणार आहे, असे श्री. मोदी म्हणाले. पक्ष कार्यकर्त्यांनी बुथ स्तरापासून पक्ष यंत्रणा सक्रिय केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हेही उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील नेते अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल व्यवस्थित सुरू असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. परंतु याच नामावलीमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याही नावाचा समावेश केला तेव्हा सर्वांना आश्‍चर्य वाटले. कारण दोनच दिवसांपूर्वी अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांच्या १५ ऑगस्टच्या भाषणाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. १५ ऑगस्ट हा पंतप्रधानांवर टीका करण्याचा मोका असता कामा नये, असा टोला त्यांनी मोदींना लगावला होता. मात्र आता त्यांची स्तुती केल्यामुळे सर्वांना आश्‍चर्य वाटले.

Leave a Comment