नवी दिल्ली- मंत्रालयातून कोळसा घोटाळ्यातील महत्त्वाचे कागदपत्रे गायब झाल्याचे वृत्त खरे ठरले आहे. हे दस्तावेज गहाळ झाल्याच्या वृत्ताला केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल यांनी दुजोरा दिला आहे. गायब झालेल्या दस्तावेजांमध्ये १९९३ ते २००४ दरम्यानची महत्त्वाची कागदपत्रे आहेत. आगामी काळात या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती जायस्वाल यांनी दिली.
सोमवारी केंद्रीय कोळसा मंत्री जायस्वाल यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यांनी यावेळी दस्तावेज मंत्रालयातून गायब झाल्याचे मान्य केले . कोळसा घोटाळ्याशी संबधित ७६५ दस्तावेज याचा तपास करीत असलेल्या सीबीआयकडे सोपविण्यात आले आहेत. मात्र १९९३ ते २००४ या वर्षांमधील महत्त्वाचे दस्तावेज मंत्रालयातून गायब झाले आहेत.
हे दस्तावेज मंत्रालयातून कसे गायब झाले, याची उच्चस्तरीय चौकशी करण्यांत येणार आहे. त्याच्या शोध घेण्यासाठी कोळसा विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. त्यांच्या व चौकशीनंतर हे कागदपत्रे कसे गायब झाले हे समजून येईल असेही केंद्रीय कोळसामंत्री जायस्वाल यांनी स्पष्ट केले.