तुंडाने तोंड उघडले

अब्दुल करीम तुंडा आता बोलायला लागला आहे. त्याच्याकडून दहशतवादी कारवायांबाबत मोेठी निर्णायक माहिती हाती लागेल अशी अपेक्षा होतीच. ती खरी ठरली आहे. तो आजवर कधी पोलिसांच्या हातात पडला नव्हता म्हणून त्याला पोलिसी हिसका काय असतो हे माहीत नव्हते. त्यामुळे तो जोरदारपणे बोलत होता. हिसका बसला आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या अधिकार्‍यांनी त्याच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला तेव्हा एकेक माहिती बाहेर यायला लागली आहे. अर्थात अजून तशी ङ्गार निर्णायक माहिती मिळाली आहे असे नाही पण मिळायला सुरूवात नक्कीच झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अटक केली तेव्हा तो निर्धास्त होता. पकडले गेलोय खरे पण अजूनही सुटलो तर तीच कामे करीन, असे उद्गार काढत होता. त्याच्याकडे सारी काही माहिती आहेे. गुप्त पोलीस तर त्याला दहशतवादी कारवायांचा महाकोश म्हणतात. त्यामुळे त्याची अटक ही दहशतवादविरोधी कार्यवाहीतली मोठीच निर्णायक उपलब्धता ठरणार आहे. त्याने पहिल्याच दिवशी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याचे सांगितले. आता ही गोष्ट भारत सरकारलाही माहीत आहे आणि सरकारने पाकिस्तानला त्याची जाणीवही करून दिली आहे पण पाकिस्तान सरकार ही गोष्ट मानत नाही.

दाऊद नेमका कोठे आहे याबाबत त्या सरकारने जो काही खुुलासा केला आहे त्यातून दाऊद पाकिस्तानातच असल्याचे दिसून आले आहे पण सरकारची ते नाकारता नाकारता तारांंबळ उडाली आहे. आता तुंडाच्या जबाबातून दाऊद विषयीच्या माहितीला दुजोरा मिळाला आहे. तुंडा हा प्रथम पाकिस्तानात गेला आणि त्याने आधी दाऊदच्याच नेतृत्वाखाली काम सुरू केले असल्याने तो दाऊदवर बराच प्रकाश टाकू शकणार आहे. त्याने आपल्या जबाबाच्या दुसर्‍या दिवशी पाकिस्तानात नकली भारतीय नोटा छापून त्या भारतात पाठवण्याचा धंदा दाऊदच करीत असल्याचे म्हटले आहे. हीही माहिती नवी नव्हती पण आता दाऊदच्या अतीशय नजिकच्या सहकार्‍याकडून ती कळत आहे. या कामात त्याला आय.एस.आय.ची मदत मिळत असल्याचेही तुंडाने सांगितले आहे पण तीही माहिती नवी नाही. आता पोलिसांनी त्याच्याकडून हे धंदे नेमके कसे केले जातात आणि या नोटा भारतात कोणत्या मार्गाने कशा कशा आणल्या जातात याची कार्यपद्धती त्याच्याकडून जाणून घेतली पाहिजे तर आपल्या गुप्तचर संघटना या कारस्थानावर शेवटचा निर्णायक घाव घालू शकतील.

दाऊद इब्राहिम असो की, लष्करे तैयबाचे दहशतवादी असोत ते पाकिस्तानी लष्कराच्या मदतीशिवाय काहीच करू शकणार नाहीत आणि लष्कर त्यांच्याकडून त्याला हवे ते करून घेत आहे. या लोकांच्या मनात कधी तरी आपल्या जन्मभूमी विषयी उमाळा दाटून आला तरीही आता नाइलाज आहे. ते आता पाक लष्कराचे बाहुले झाले आहेत. म्हणून पाकिस्तानच्या लष्करातला मेजर ताईब हा अधिकारी या नकली नोटांच्या कारस्थानावर नजर ठेवून असतो आणि सार्‍या गोष्टी दाऊदकडून करून घेत असतो. त्यांच्या या कारवायांचे अंतरंग अस्वस्थ करणारे आहे. तुंडा याने भारतातून पाकिस्तानात गेलेल्या आणि आता आय. एस. आय. चा हस्तक झालेल्या इक्बाल काना या दहशतवाद्याच्या सोबत काम केले असून त्याच्या मार्ङ्गत दरसाल १६०० कोटी रुपये किंमतीच्या नकली नोटा भारतात पाठवल्या आहेत. भारतात कधी दहशतवादी कारवाया झाल्या की, त्या कोणी केल्या असाव्यात याबाबत भारतीत गुप्तचर यंत्रणा नाना प्रकारचे तर्क करीत राहतात. ती कारवाई लष्करे तोयबाची, जैश ए महंमदची, आयएसआयची की दाऊदची यावर आपल्या यंत्रणा अंदाज करीत बसतात पण हे अंदाज करणे कसे निरर्थक असते हे तुंडाच्या जबाबातून कळत आहे. या सार्‍या संघटना आणि व्यक्ती काही वेगवेगळ्या नाहीत.

त्या वरकरणी निराळ्या भासत असल्या तरीही त्या व्यवस्थित समन्वयाने काम करीत असतात असे तुंडाकडून कळत आहे. म्हणूनच तो पाकिस्तानात असताना या सर्वांशी नित्य संपर्कात होता. यातल्या कोणालाही तो सहजपणे भेटू शकत होता. अशा प्रकारच्या कारवाया करणारे देशद्रोही लोक कितीही बनेल असले तरीही त्यांनाही अहंकार असतो आणि वरच्या पातळीवर दोन व्यक्तींच्या अहंकाराचा टकराव झाला की त्यातला कोणी तरी एकजण नाराज होतोच आणि तो आतल्या बातम्या बाहेर ङ्गोडतो. चोरांची टोळी ङ्गुटते तेव्हाच पोलिसांना माहिती मिळते असे म्हणतात ते काही चूक नाही. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यापर्यंत तुंडा ङ्गॉर्मात होता. पण तिथून त्याला वाढत्या वयामुळे कोणत्याही कटापासून दूर ठेवले जायला लागले. तिथे त्याचा अहंकार दुखावला गेला. या स्ङ्गोटात अबु जुंदाल याच्यावर मोठी कामगिरी सोपवली गेली होती. ती आपल्यावर सोपवायला हवी असे तुंडाला वाटत होते पण तसे न झाल्याने तो नाराज झाला असे तो आता सांगत आहे. अर्थात त्याची सारी माहिती आपल्या तपास यंत्रणा गाळूनच घेतील यात काही शंका नाही. शेवटी तोही मुरलेला आहे. तो आपल्या मतलबाची माहिती लपवूनही ठेवू शकतो आणि नको ती माहिती देऊ ेशकतो.