अमेरिकेत भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात- अण्णांचे उस्फूर्त स्वागत

न्यूयॉर्क – भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे काढण्यात आलेल्या विशाल रॅलीमध्ये भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनाचे ज्येष्ठ नेते अण्णा हजारे व अभिनेत्री विद्या बालन यांनी सुमारे दोन लाख भारतीयांचे नेतृत्व केल्याचे वृत्त आज (सोमवार) सूत्रांनी दिले. भारताच्या बहुरंगी संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या या जनसागरामध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मॅनहटन येथील मेडिसन ऍव्हेन्यू येथे जल्लोषपूर्ण वातावरणातील या विशाल उत्सवाचे नेतृत्व अण्णा हजारे व विद्या बालन यांनी केले. येथील विविध भारतीय संस्थांची पितृसंस्था असलेल्या फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशन्स’ या संस्थेने या उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी अण्णा हजारे झिंदाबाद’, भ्रष्टाचारमुक्त भारत’ अशा आशयाच्या विविध घोषणांनी येथील परिसर दणाणून गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

या वेळी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारे यांचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले. हजारे यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी लोक धडपडत असल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबावे लागत होते. या उत्सवाची ग्रँड मार्शल’ असलेल्या विद्या बालन हिचेही यावेळी मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्या बालन हिने आपण इतका देखणा उत्सव याआधी पाहिला नसल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली. अण्णा यांना उस्फूर्त पाठिंबा देतानाच येथील उत्सवात सहभागी झालेल्या अमेरिकन-भारतीयांनी भ्रष्टाचारविरोधी लढ्यात अण्णांच्या साथीने आपणही उभे असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.