कैरो – इजिप्तमधील विद्यमान सरकारने कट्टर इस्लामवादी मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेवर बंदी घालण्याचा विचार सुरू केला आहे. या संघटनेने गेल्या दीड महिन्यापासून त्यांचे नेते माजी अध्यक्ष महंमद मोर्सी यांना पुन्हा एकदा अध्यक्ष करावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू केला आहे. त्यामुळे इजिप्तमध्ये प्रचंड रक्तपात होत असून देशात यादवी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तिचा विचार करून या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी सरकारमधील काही घटक करत आहेत.
मुस्लीम ब्रदरहूडवर बंदी येण्याची शक्यता
सध्या सत्तेवर असलेल्या सरकारचे हंगामी पंतप्रधान हाझेम बेबलवी आणि लष्कर प्रमुख अब्देल ङ्गतह अल सिसी यांनी गेल्या काही दिवसांपासून मुस्लीम ब्रदरहूडच्या कार्यकर्त्यांना निदर्शने आणि हिंसाचार यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. परंतु या आवाहनाला प्रतिसाद न देता मुस्लीम ब्रदरहूडने आपले आंदोलन जारी ठेवले आहे. जागोजाग निदर्शने करणार्या या आंदोलकांवर पोलीस थेट गोळीबार करत आहेत आणि त्यात गेल्या १५ दिवसांत ८०० पेक्षाही अधिक निदर्शक मारले गेले आहेत.
प्रत्यक्षात मुस्लीम ब्रदरहूड ही संघटना इजिप्तमध्ये अतिरेकी संघटनाच मानली जाते. १९५४ सालपासून तिच्यावर बंदीच होती. परंतु होस्नी मुबारक यांची दीर्घकाळ सुरू असलेली सत्ता बदलण्याच्या आंदोलनात या संघटनेने पुढाकार घेतला. देशातली जनता मुबारकशाहीला कंटाळलेलीच होती म्हणून तिने सुद्धा या संघटनेचे नेतृत्व स्वीकारले. मुबारकशाही संपली आणि मुस्लीम ब्रदरहूडचे नेते महंमद मोर्सी हे अध्यक्ष झाले. मात्र मोर्सी यांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत म्हणून त्यांच्याही विरोधात बंड झाले आणि त्यांना पदच्यूत करण्यात आले.
मोर्सी आता सत्तेबाहेर असले तरी त्यांच्या जागी सत्तेवर आलेल्या हंगामी सरकारमध्ये त्यांचा समर्थकांचा समावेश केला जाईल, असे आश्वासन हंगामी पंतप्रधानांनी दिले आहे. परंतु तरीही मोर्सी समर्थकांचे आंदोलन जारी आहे. त्यांनी आंदोलन न करता देशात शांतता पाळावी आणि मुबारक यांच्या जागी स्थायी स्वरूपाची स्थिर व्यवस्था आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांना करण्यात आलेली आहे. पण या विनंतीला मोर्सी समर्थक मान देत नाहीत. म्हणून आता त्यांच्या संघटनेवर बंदी घालण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे.