झेंडा फडकवल्याबद्दल दलितांना मारहाण

बिहार – बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील बड्डी या गावी सवर्णांनी दलितांना स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी झेंडा ङ्गडकविण्यास मनाई केली असतानाही त्यांनी ती मनाई धुडकावून झेंडावंदन केले. त्यामुळे चिडलेल्या सवर्णांनी दलितांवर हल्ला केला, त्यात एक जण मारला गेला तर महिला आणि लहान मुलांसह ४० जण जखमी झाले. दोघा जखमींची प्रकृती गंभीर आहे. बड्डी हे गाव राजधानी पाटणापासून केवळ १६० कि.मी. अंतरावर आहे.

गावातल्या दलितांनी गुरु रविदास यांच्या मंदिरासमोर स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्याचे ठरवले होते. परंतु त्यांनी ध्वजवंदन करू नये असे गावातल्या सवर्णांनी त्यांना बजावले. या गावात मंदिराच्या जागेवरून संघर्ष झालेला आहे. या जागेवर संत रविदास यांचे मंदिर न उभारता या भागातील स्वातंत्र्य सैनिक निशांत सिंग यांचे स्मारक उभे करावे, अशी सवर्णांची मागणी आहे. त्यातून हा संघर्ष निर्माण झाला आणि त्यात एका दलिताचा बळी गेला.

भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या सत्यशोधन समितीने या गावाला भेट दिली. सवर्णांनी संत रविदास यांच्या मूर्तीची सुद्धा विटंबना केली असल्याचे या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी अन्य एका मंदिराचीही मोेडतोड केली असल्याचे समितीने नमूद केले आहे. या प्रकरणातल्या जखमींना पाटण्याच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

दुर्दैवाची गोष्ट अशी की, ही घटना घडण्याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटण्याजवळच्या एका गावाला भेट देऊन तिथल्या बहुसंख्य दलितांच्या विनंतीवरून दलित वस्तीत झेंडावंदन केले होते. त्याच्या दुसर्‍याच दिवशी याच परिसरात हा प्रकार घडल्यामुळे खेद व्यक्त केला जात आहे.