गुळगुळीत प्रेम त्रिकोण

दिग्दर्शक मिलन लुथरियाचा चित्रपट म्हटलं की सतार, ऐशीचे दशक पडद्यावर बघायला मिळणार हे समीकरणच बनले आहे. त्याचा ‘वन्स अपॉन ए टाईम ईन मुंबई दोबारा’ हा 2010 साली आलेल्या ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या भागात अजय देवगण, इमरान हाश्मी आणि कंगना राणावत यांनी मुख्य भूमिका केली होती.

‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई मध्ये इमरान हाश्मीने साकारलेला शोएब या भागात अक्षय कुमारने साकारला आहे. संपूर्ण मुंबईवर राज्य करण्याची शोएबला इच्छा आहे. त्याचे वास्तव्य खाडी देशात असून मुंबईत त्याचा शत्रु रावल ( महेश मांजरेकर) शोएबच्या गँगला वरचढ ठरत आहे म्हणून त्याचे अस्तित्व मिटविण्यासाठी तो मुंबईत परतला आहे. मुंबई पोलिस त्याच्या मागावर आहे यामुळे तो आपल्या जुन्या प्रेयसीला भेटण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हरच्या वेषात जातो, मात्र इतर ठिकाणी तो बिनधास्त फिरतो हा विरोधाभास का दाखला हे समजत नाही. दरम्यानच्या काळात त्याची जास्मिन (सोनाक्षी सिन्हा) शी भेट होते. या भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर एकतर्फी प्रेमात होते. यानंतर या चित्रपटात शोएबच्या विश्वासातला व्यक्ती असणार्‍या अस्लमचा (इम्रान खान) प्रवेश होतो. जस्मीन आणि अस्लमचे सुत जुळते आणि कथा वेगळ्या वळणावर येते. असा प्रेमाचा त्रिकोण बॉलिवुडच्या असंख्य चित्रपटामधुन आपण पाहिलेला आहे.

‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ अक्षय कुमारने कुख्यात डॉनची भूमिका साकारली आहे. पण हा नक्की डॉन आहे का? असा प्रश्‍न आपल्याला पडतो.प्रिक्वेल मध्ये डॉन भोवती फिरणारी संपुर्ण कथा होती तर यामध्ये ती प्रेम त्रिकोणापुरती मर्यादीत झाली आहे. चित्रपटाचे संवाद लेखन करणार्‍या रजत आरोरला लिखाणाचे पैकीच्या पैकी गुण द्यायला हरकत नाही, हमखास टाळ्या आणि शिट्ट्या मिळणारे संवाद आहेत अक्षय कुमारने संवाद म्हणताना त्यात धमाल आणली आहे. मात्र कथा सशक्त नसल्याची जाणिव वारंवार होते.

या चित्रपटाच्या प्रीक्वेलमध्ये भरपूर ड्रामा होता, कमालीचे संवाद होते. त्यामध्ये अजय देवगणने मध्यवर्ती भूमिका साकारली होती. अजयने यापूर्वी राम गोपाल वर्मांच्या ’कंपनी’मध्ये दाऊद इब्राहिमच्या आयुष्यावर अधारीत भूमिका साकारली होती त्यात तो चपखल बसला होता. 70 च्या दशकातील चित्रपटांची आठवण यावी, अशा स्वरूपाचं दिग्दर्शन करण्यात दिग्दर्शक मिलन लुथरिया नेहमीच यशस्वी ठरला आहे हा चित्रपटही त्याला अपवाद नाही.

शोएबची व्यक्तिरेखा साकारताना अक्षयने आपला सर्व अभिनय पणाला लावला आहे. अक्षयने आपण व्हर्सटाईल अभिनेता असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. इमरान खानने नव्या रूपात प्रेक्षकांना जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्री बनू इच्छिणार्‍या जस्मिन या काश्मिरी मुलीच्या भूमिकेत सोनाक्षी सिन्हा सुंदर दिसली आहे. मिळालेल्या भूमिकेला सोनाक्षीने पूर्ण न्याय दिला आहे. या चित्रपटाच्या गाण्यामुळे उत्सुकता अधिक वाढली होती. ‘ये तुने क्या किया’ हे गाणं आणि अमर अकबर अँथोली सिनेमा’तील तय्यब अली’ ही गाणी श्रवणीय आहेत. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई‘ च्या सिनेमाच्या तुलनेत दुसर्‍या भागाचा प्रभाव फारच कमी जाणवतो. चित्रपटाची कथा डॉन ऐवजी त्याच्या प्रेमाभोवतेच गुंफण्यात आल्याने प्रेक्षकांची निराशा झाली आहे.

 

Leave a Comment