सोने-चांदी भरात

शनिवारी सोन्याने तोळ्यामागे 515 रुपयांची उसळी घेत 31,525 ची पातळी गाठली. हा आठ महिन्यांचा उच्चांक आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची नीचांकी घसरण या मौल्यवान धातूच्या पथ्यावर पडली आहे. मागील दोन दिवसांतच सोन्याने 1825 रुपयांची कमाई केली आहे. सोन्यातील तेजीचा कल आगामी काळात कायम राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.  

मार्चमध्ये सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ३० हजार ७७ रूपये इतका वाढला होता. त्यानंतर मागणीत काही प्रमाणात घट झाल्याने सोन्याचा भाव घसरला. मात्र, जागतिक बाजारपेठेतील उलाढालीमुळे आणि देशातील वाढत्या खेरदीमुळे सोन्याची मागणी ३.५६ टक्के इतकी वाढली आहे. उत्सवांचा सिझन आणि लग्नसराईचा काळ सुरू होणार आहे. त्यामुळे सोन्याच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या डिलिव्हरीसाठी झालेल्या फ्युचर ट्रेडींगचेही भाव वधारले आहेत. जागतिक बाजारातही सोन्याच्या दर अर्ध्या टक्याने वाढला आहे.

सरकार सोने-चांदीची आयात कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र , आयात शुल्क वाढल्याने सोन्याच्या भावात होणारी वाढ ही ग्राहकांना वाढणाऱ्या किमतीमुळे आकर्षक वाटत आहे. त्यामुळे सोन्याचे आकर्षण कमी होण्याऐवजी वाढत आहे. सतत वाढत असलेल्या शुल्कामुळे पुढील वाढ होण्यापूर्वी अजून सोने घ्यावे, अशी मानसिकता सामान्य ग्राहकांची झाली आहे.

केवळ देशातीलच नाही, तर चीनकडून गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याची खरेदी सुरू आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सध्या सुरू असलेला आर्थिक मदतीचा कार्यक्रम फेडरल रिझर्व्हकडून आवरता घेण्याची शक्यता यामुळे विदेशी सराफा बाजारातही सोन्याला झळाळी आली आहे.