नवी दिल्ली- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम अद्यापही पाकिस्तानमध्येच रहात असल्याचे दाऊदचा विश्वासू साथीदार अब्दुल करीम टुंडा याच्या चौकशीत उघड झाले आहे. टुंडा (70) याला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी रात्री भारत-नेपाळ सीमेवर अटक केली. लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी सईद अब्दुल करीम ऊर्फ टुंडा हा जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख हाफीज सईद आणि 26/11 हल्ल्याचा कट रचणारा झकीर-उर-रेहमान लखवी यांचा जवळचा साथीदार आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टुंडाने चौकशीत अनेक खुलासे केले आहेत. प्राथमिक चौकशीत त्याने दाऊद, हाफिज सईद तसेच आयएसआयच्या अनेक भारतविरोधी कारवायांची माहिती उघड केली आहे. त्याने 2002 मध्ये हाफिज सईद आणि दाऊदची भेट घडवून आणली होती. तेव्हा दाऊद कराचीत राहात होता. आजही तो कराचीतच राहात असल्याचा दावा त्याने केला आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांसह 40 स्फोटांत टुंडा आरोपी आहे. भारताने पाकिस्तानला पाठवलेल्या मोस्ट वाँटेडच्या यादीत टुंडा 15 वा आरोपी आहे. 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्फोट घडवण्याचा कट त्याने रचला होता. त्याच्याकडे अब्दुल खुद्दुस नावाने पाकिस्तानी पासपोर्ट सापडला आहे. या वर्षी 23 जानेवारीला हा पासपोर्ट काढण्यात आला आहे.
टुंडाच्या चौकशीत लष्कर-ए-तोयबाच्या अनेक कटांचा पर्दाफाश झाला आहे. तसेच आयएसआयच्या अनेक भारतविरोधी कारवायाही उघड झाल्या आहेत. त्याचवेळी काही पोलिस अधिका-यांनी मात्र टुंडा खरी माहिती लपवत असून तपास पथकाला गुंगारा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.