तुंडाच्या अटकेचे कुटुंबियांकडून स्वागत

नवी दिल्ली – मोस्ट वॉन्टेड बॉम्बगुरु तसेच दाऊद इब्राहिमचा नजिकचा सहकारी अब्दुल करीम तुंडा याच्या कुटुंबियांनी त्याच्या अटकेचे स्वागत केले आहे. त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला ताबडतोब फाशी द्यावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी आणि घराच्या आसपास राहणार्‍या शेजार्‍यांनी सुद्धा केली आहे. तो अतिरेकी असल्याचे सर्वांना माहीत होते आणि त्याच्या नातेवाईकांना तसेच कुटुंबियांना त्याचा त्रास होत असे. आता त्याला अटक झाल्यामुळे या लोकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे आणि त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

तुंडाच्या फरार होण्याने पोलीस त्याच्या शोधार्थ ङ्गिरत होते आणि त्याचा सुगावा लागावा म्हणून कुटुंबियांना त्रास देत होते. त्याचा भाऊ अब्दुल मलीक याला तर या संबंधात फारच त्रास झालेला आहे. खरे म्हणजे १९९१ सालपासून अब्दुल मलीकने आपल्या भावाला पाहिलेले सुद्धा नाही आणि त्याने आपले गाव सोडून १९९५ सालपासून हापूरमध्येच स्थलांतर केलेले आहे. त्याचे मूळ गाव गाझियाबाद हे आहे.

दरम्यान, करण्यात आलेल्या चौकशीमध्ये तुंडाजवळ पाकिस्तानी पासपोर्ट सापडला आहे. त्याने पाकिस्तानात जाऊन पुढे अतिरेकी कारवाया केल्या आहेत. अब्दुल मलीकची पत्नी आणि तुंडाची भावजय ही तर तुंडामुळे आपल्या कुटुंबाला किती त्रास झाला हे सांगताना आपला राग आवरू शकत नाही. त्याला अटक केल्याच्या बातम्या आपल्याला अधूनमधून ऐकायला मिळत होत्या, परंतु प्रत्येक वेळी ती अफवा ठरायची. आता मात्र तो पोलिसांच्या हाती सापडल्यामुळे पोलिसांपेक्षा आपल्यालाच जास्त आनंद झाला आहे असे त्याच्या भावजयीने सांगितले.

१९९१ पासून त्याचा कुटुंबियांशी काहीच संबंध नव्हता. त्यामुळे तो जिवंत आहे की मेला आहे हेही कळत नव्हते. बर्‍याचवेळा तो मरण पावल्याच्या बातम्या येऊन पोचायच्या. २००० साली तो मरण पावल्याचे कळले होते, परंतु २००५ साली एका अतिरेक्याने दिलेल्या जबाबात तुंडा जिवंत असल्याचे कळले. अशा खतरनाक माणसाला गोळ्या घालून ठार केले पाहिजे, असे त्याच्या भावजयीने म्हटले.