केंद्र सरकार महागाईमुळे पडेल – नायडू

रांची – केंद्रातले डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार वाढत्या महागाईमुळे सत्ताभ्रष्ट होईल, असे भाकित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी वर्तविले आहे. ते रांची येथे पत्रकारांशी बोलत होते. १५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९८ साली दिल्लीतले भारतीय जनता पार्टीचे सरकार अचानकपणे वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे कसे पडले होते याची आठवण त्यांनी कॉंग्रेस सरकारला करून दिली. सध्याच्या महागाईने दरवाढीचे सगळे विक्रम मोडले आहेत आणि सामान्य माणसाचे जगणे हे महाग होऊन गेले आहे, अशी टीका नायडू यांनी केली.

निवडणुकीच्या निमित्ताने केल्या जाणार्‍या जनमत चाचण्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने ङ्गार सकारात्मक असे निष्कर्ष निघालेले नाही. याबाबत प्रश्‍न विचारले असता श्री. नायडू यांनी, अशा प्रकारच्या सर्वेक्षणांच्या विश्‍वासार्हतेवर नेहमीच प्रश्‍नचिन्ह उभे राहिलेले आहे आणि हे निष्कर्ष नेहमीच चुकीचे ठरलेले आहेत असे प्रतिपादन केले. भारतीय जनता पार्टीचा अशा सर्वेक्षणांवर विश्‍वास नाही, असे ते म्हणाले.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शंभर जाहीर सभा देशभरामध्ये घेण्याची योजना असल्याची माहितीही नायडू यांनी दिली. श्री. नायडू हे झारखंडातील भाजपा नेत्यांशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा करण्यासाठी रांचीला आले होते.