सिडने – ब्रिटनच्या पार्लमेंटच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियानेही नरेंद्र मोदी यांना भेटीचे निमंत्रण दिले आहे. ऑस्ट्रेलियाचे भारतातले उच्चायुक्त पॅट्रिक सकलिंग यांनी गांधी नगर येथे जाऊन श्री. मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना ऑस्ट्रेलिया भेटीचे निमंत्रण दिले. अशी माहिती गुजरात सरकारच्या प्रसिध्दी खात्याने दिली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे फार दृढ संबंध आहेत आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असते. त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलियाच्या सरकारसाठी गुजरातला फार महत्त्व आहे कारण गेल्या दहा वर्षात गुजरात आणि ऑस्ट्रेलिया यांचे व्यापारी संबंध वाढलेले आहेत. असे सकलिंग यांनी म्हटले असल्याचे गुजरातच्या माहिती खात्याच्या पत्रकात म्हटले आहे.
श्री. पॅट्रिक सकलिंग यांनी या निमित्ताने मोदी यांची भेट घेऊन शिक्षण, क्रीडा, कृषी दुग्धव्यवसाय, जल व्यवस्थापन इत्यादी विषयांवर गुजरात आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातले सहकार्य कसे वाढवता येईल अशी यावर चर्चा केली. श्री. मोदी यांनी या चर्चेच्या शेवटी व्हायब्रंट गुजरात या उपक्रमात ऑस्ट्रेलियाने सहभागी व्हावे यासाठी त्यांना निमंत्रण दिले.
२०१५ साली व्हायब्रंट गुजरात, ग्लोबल ऍग्रोटेक समिट ऍन्ड एक्झिबिशन या नावाने व्हायब्रंट गुजरात उपक्रम राबवला जाणार असून त्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर निमंत्रित केले जाणार आहे. त्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मोदी यांनी दिले. गेल्याच आठवड्यात अशा रितीने ब्रिटनच्या पार्लमेंटमधील विरोधी पक्षाने मोदी यांना ब्रिटन भेटीचे निमंत्रण दिले आहे.