दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव स्पर्धेत साईनाथ मंडळ प्रथम

पुणे, – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून साईनाथ मंडळ ट्रस्टला 51,000 हजारांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

साईनाथ ट्रस्ट मंडळाने गेल्यावर्षी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार हा देखावा सादर केला होता. स्पर्धेत द्वितीय क्रमांक धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाला मिळाला आहे. तृतीय क्रमांक अनुक्रमे भोपळे चौकातील हिंद तरुण मंडळ आणि विनायक नवयुग मंडळ यांना विभागून देण्यात आला आहे. चतुर्थ क्रमांक साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर मंडळाला मिळाला आहे. तर, पाचवा क्रमांक अखिल गणेश बाग मित्र मंडळाला मिळाला आहे. ही स्पर्धा शहराच्या पूर्व, पश्‍चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्य विभाग अशा पाच विभागांत घेण्यात आली होती. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम येत्या 23 तारखेला शिवाजीनगर पोलीस ग्राऊंड येथे सायंकाळी 5.30 ला होणार आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण होणार आहे. पुण्यातील सर्व आमदार, महापौर वैशाली बनकर आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

मिरवणुकीसाठी एकच ढोल पथक
मिरवणुकीसाठी दोनच ढोल पथक असावेत या पोलिसांच्या प्रस्तावाच्या पार्श्‍वभूमीवर मंडळातर्मे स्वरूपवर्धीनीचे एकच पथक असणार आहे. मागीलवर्षीही एकच ढोल पथक होते. सर्व मंडळांनादेखील एकच ढोलपथक ठेवावे, असे आवाहन करण्यात येणार आहे, असे गोडसे यांनी सांगितले.

विमानतळाला रुग्णवाहिका
विमानतळावर उतरणार्‍या प्रवाशांना तातडीची आरोग्य विषयक मदत हवी असल्यास रुग्णालय जवळपासच्या परिसरात नाहीत ही बाब लक्षात घेऊन मंडळाने विमानतळ प्रशसनाला रुग्णवाहिका देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावास प्रशासनाने मान्यता दिली असून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी 35 लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका मंडळाच्या वतीने विमानतळास देण्यात येणार असल्याचे गोडसे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment