होशियारपूर – पाकिस्तानच्या कैदेत असताना मारला गेलेला सरबजितसिंग ज्या कारागृहात खितपत पडला होता त्याच कोट लखपाल तुरुंगात अनेक वर्षांपासून झिजत पडलेल्या ११ भारतीय कैद्यांनी आपली सुटका तरी करावी किंवा आपल्याला गोळ्या घालून ठार करण्यात यावे अशी आर्त मागणी भारत सरकारकडे केली आहे. पाकिस्तानच्या कैदेत असे जनावरापेक्षाही हीन जीवन जगण्यापेक्षा मरण बरे असल्याचे या कैद्यांनी सरकारला पाठवलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
आपले येथीला जगणे फार हाल अपेष्टांचे आहे. कैदेची मुदत संपली तरीही आपण तुरुंगात हे कष्टाचे आणि दु:खाचे जीणे जगत आहोत असे या कैद्यांचे म्हणणे आहे. पंजाबातील भाजपाचे खासदार अविनाश राय खन्ना यांनी हे निवेदन मिळवले असून ते पत्रकारांसमोर सादर केले आहे. हे निवेदन पाकिस्तानच्या सरकारलाही सादर करण्यात आले आहे. आपण ते आता भारताच्या संसदेत सादर करणार आहोत असे खासदार खन्ना यांनी म्हटले आहे.
हिंदीत लिहिलेल्या या पत्रावर किरपाल सिंग, कुलदीप सिंग, धरमसिंग, महंमद फरिद, तिलक राज, मकबूल लोके, अब्दुल माजीद, संभूनाथ, सुरजा राम, मोहिंदर सिंग आणि पुनवासी यांच्या सह्या आहेत. त्यांना गैरसमजाने, चुकून सीमा ओलांडल्याने अटक करून पाकिस्तानच्या कैदेत डांबण्यात आले आहे. या प्रत्येकाचे प्रकरण आणि हकिकत वेगळी आहे पण पाकिस्तान किंवा भारत सरकार यापैकी कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ते हालात दिवस काढत आहेत.
याच कारागृहात अजून २१ भारतीय कैदी असेच दिवस कंठत असून त्यात चार महिला आहेत. हे लोक तर तिथल्या जाचामुळे वेडे झाले आहेत. त्यांची नावेही कोणाला माहीत नाहीत त्यांना विनाकारण तिथे डांबण्यात आले आहे. ही एकट्या कोट लखपाल तुरुंगाची कहाणी आहे. पाकिस्तानच्या अन्य काही कारागृहांत सुमारे २०० भारतीय कैदी खितपत पडले आहेत अशी माहिती खासदार खन्ना यांनी पत्रकारांना दिली.