फिलीपाईन्समध्ये जहाजाच्या अपघातातात २४ जणांचा मृत्यु

मनीला: फिलीपाईन्समधील सेबू शहराजवळील समुद्रात प्रवासी आणि मालवाहू जहाजामध्ये धडक झाली. यामध्ये २४ जणांचा मृत्यु झाला, तर २८० प्रवासी बेपत्ता आहेत. अपघातावेळी जहाजात सुमारे ७०० प्रवाशी होते. अन्य प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावेळी स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघातानंतर ३० मिनिटांतच प्रवासी जहाज समुद्रात बुडाले. या जहाजात ६९२ प्रवासी होते. प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. हे जहाज फिलीपाईन्समधील सेबू बंदराकडे येत होते. ही धडक इतकी भीषण होती, की अपघातानंतर काही वेळातच पाण्यावर मृतदेह तरंगत होते, असे अपघातातून वाचलेल्या एका प्रवासी महिलेने सांगितले. या महिलेसह तिचा मुलगा बचावला आहे.

अपघातानंतर क्षणार्धात शेकडो प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. या दुर्घटनेवेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. तसेच अंधारामुळे काही जणांना बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागला. या जहाजामधील २८० प्रवासी बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.