नवी दिल्ली – दिल्लीत गेल्या डिसेंबर मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना आपल्या बचावासाठी दोन दोन साक्षीदार आणायला परवानगी देत न्यायालयाने या प्रकरणाची अंतिम सुनावणी २२ ऑगष्टपासून सुरू होईल असे जाहीर केले. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश योगेश खन्ना यांनी आरोपींच्या वकिलांना आपले युक्तिवाद येत्या २२ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश दिला. आपण २२ तारखेला त्यांचे म्हणणे संपवून अंतिम सुनावणीला सुरूवात करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले.
दिल्ली बलात्कार प्रकरण : २२ पासून अंतिम सुनावणी
वादीचे साक्षीदार म्हणून ज्या तिघांच्या साक्षी झाल्या आहेत त्या बनावट असल्याचे प्रतिवादी आरोपींच्या वकिलांनी केला होता. त्यावर न्यायालयाने त्यांना त्याच्या म्हणण्यास पुष्टी देणारे दोन साक्षीदार आणण्याची अनुमती दिली. तसेे तर न्यायालयाने बचाव पक्षाच्या साक्षी नांेंदवण्याचे काम मागेच बंद केले होते पण त्यांना शेवटच्या पायरीपर्यंत आपली बाजू मांडायला संधी मिळाली पाहिजे असे म्हणून न्यायालयाने त्यांना अजून दोन साक्षीदार आणण्याची संधी दिली आहे.
या दोन आरोपींनी घटनेच्या वेळी आपण त्या ठिकाणी नव्हतोच असा पवित्रा घेतला होता आणि तसे दावे करताना काही पुरावे आणले होते पण ते पुरावे चुकीचे असल्याचे सरकारी साक्षीदारांच्या साक्षीतून दिसून आले पण सरकारी साक्षीच बनावट आहेत असे आरोेपींनी म्हटले असून न्यायालयाने त्यांना तसे सिद्ध करण्याची परवानगी दिली आहे. त्या साक्षी संपल्यावर मात्र अंंंतिम सुनावणी सुरू होईल असे न्यायालयाने बजावले आहे.