दिल्ली – कुविख्यात गुंड दाउद इब्राहिमचा साथीदार व अनेक बाँबस्फोटातील संशयित अब्दुल करीम टुंडा याला अटक करून भारतात आणले असल्याची माहिती दिल्ली पोलीसांनी शनिवारी दिली. या अटकेमुळे दाउदला धक्का बसल्याचे मानण्यात येत आहे. लष्कर-ए – तय्यबातील दहशतवादी असलेल्या टुंडा याला नेपाळ सीमेलगत अटक करून त्याला भारतात आणण्यात आले.
मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला परंतु नंतर मुंबईत राहणारा अब्दुल करीम १९८५च्या भिवंडी दंगलींनंतर दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला. १९९६ ते १९९८ या कालावधीत दिल्ली परीसरामध्ये तसेच वाराणसी व कानपूरमध्ये घडवण्यात आलेल्या बाँबस्फोटांमध्ये त्याचा महत्त्वाचा सहभाग असल्याचा आरोप आहे. अब्दुल करीमचा डावा हात बाँब बनवत असताना झालेल्या अपघातात तुटल्यामुळे त्याला टुंडा हे नाव पडल्याचे सांगण्यात येते. या आधी टुंडाच्या अनेक साथादारांना अटक करण्यात आली होती.
आता टुंडाच्या अटकेमुळे भारतविरोधी कारवायांमध्ये असलेला पाकिस्तानचा सहभाग सिद्ध करता येणार आहे. पाकिस्तान सतत भारतविरोधी भूमिका घेत असूनही ते मान्य करण्यास तयार नसल्याणने टुंडाच्या अटकेमुळे भारत ठोस पुरावा देऊ शकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.