उंचे लोक उंची पसंद

लंडन – तुर्कस्तानच्या सुलतान कोसेन या शेतकर्‍याने जगातला सर्वात उंच माणूस होण्याचा मान मिळवला असून त्याने नुकतीच लंडनमध्ये येऊन गिनेज बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये आपल्या नावाची नोंद असल्याची खात्री करून घेतली आहे. सुलतान कोसेनची उंची आठ फुट एक इंच मोजली गेली आहे. सुलतान हा पूर्व तुर्कस्तानातल्या मार्दिन या शहरात राहतो. त्याची उंची फार असल्यामुळे गुडघ्याला बाक आला आहे. म्हणून त्याला हातात भली मोठी काठी घेऊन चालावे लागते. तो लंडनमध्ये गुडघ्यावर इलाज करण्यासाठी आला होता. तो रस्त्यावरून चालायला लागला तेव्हा त्याला पाहण्यासाठी लोकांची मोठीच गर्दी झाली.

सुलतानची उंची आठ फुटापेक्षा जास्त आहे आणि त्याची नोेंद झाली आहे पण जगातला सर्वात उंच माणूस कोण यावर सतत वाद होत आले आहेत. चीनमधील बास्केट बॉल पटू शाओ लियांग हाही सुलतान इतकाच उंच आहे. त्याचाही जगातला सर्वात उंच माणूस असल्याचा दावा आहे. पण गिनेज बुकाच्या तज्ज्ञांच्या मते त्याची खरी उंची सात फूट साडे पाच इंचच आहे. भारतातला हरियाणात राहणारा विकास उप्पल हा तर सुलतानपेक्षा दोन इंच उंच होता. तो २००७ साली मरण पावला.

पुण्यातही एक कुलकर्णी फॅमिली आहे. या कुटुंबातले प्रमुख शरद कुलकर्णी हे काही जगातले सर्वात उंच वगैरे काही नाहीत पण त्यांची उंची ७ फूट दीड इंच आहे. जगातले इतर उंच लोक यापेक्षा एक फुटाने उंच आहेत पण त्या सर्वांचे वैशिष्ट्य असे आहे की त्यांच्या कुटुंबात ते एकटेच उंच आहेत. कुलकर्णी यांचे वैशिष्ट्य असे की त्यांचे कुटुंबच उंच आहे. त्यांच्या पत्नीची उंची ६ फूट अडीच इंच आहे तर त्यांच्या दोन कन्याही सहा फुटापेक्षा अधिक उंच आहेत. म्हणजे पुण्यातली कुलकर्णी फॅमिली ही जगातली सर्वात उंच फॅमिली आहे.

टॉप टेन लंबू लोक

१. पॅट्रिक कोटर आयर्लंड २. विकास उप्पल भारत
३. डॉन कोहलर अमेरिका ४. बर्नार्ड कोयेन अमेरिका
५. सुलतान कोसेन तुर्कस्तान ६. एडवर्ड ब्यूप्रे कॅनडा
७. वैनो मिल्लीराईन फिनलंड ८. जॉन कैरोल अमेरिका
९. जॉन रोगन अमेरिका १०. रॉबर्ट वाडलो अमेरिका