रोमानियन गर्लफ्रेंडपासूनही दूर झाला सलमान

आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारा बॉलीवूडचा दबंग खान सलमानने पुन्हा एकदा बातमीचा विषय दिला आहे. सलमानचे मागील काही दिवसांपासून रोमानियन मॉडेल लुलिया वंटुरसोबत सूत जुळले होते. मात्र काही दिवस तिच्यासोबत फिरल्यानंतर आता त्याने आपल्या या नव्या गर्लफ्रेंडपासून दूर होण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. कतरिनासोबतचे संबंध संपुष्टात आल्यानंतर सलमानच्या या नव्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. लुलिया सलमानच्या आयुष्यात येण्याआधी त्याची अनेक अभिनेत्रींसोबत जवळीक निर्माण झाली होती.

संगीता बिजलानी, ऐश्‍वर्या राय व कतरिना कैफ ही त्यातील काही प्रमुख नावे. कतरिनापासून दुरावल्यानंतरच सलमानचे नाव लुलियाशी जोडण्यास सुरुवात झाली. मात्र लुलियाचा याआधीच एक विवाह झाला असल्याने सलमानची घरची मंडळी त्यांच्या या नात्यावर नाखूश होते. त्यानंतर तिच्या भूतकाळाशी संबंधित असलेली एकेक गोष्ट घरच्या लोकांना समजली. अर्थात लुलिया या गोष्टी सातत्याने नाकारत राहिली, पण सलमानच्या कुटुंबीयांनी अखेर या दोघांनी वेगळे झालेलेच चांगले ठरेल, असा निर्णय करून त्यांनी लुलियाच्या नावावर फुली मारली.

सूत्रांच्या माहितीनुसार, लुलियावरून सलमान व त्याच्या घरातील सदस्य यांच्यात एवढे महाभारत घडल्यामुळे गेल्या शुक्रवारी सलमान आपला अतिशय जवळचा मित्र बाबा सिद्दिकी याच्यासोबत एकटाच ईद साजरी करताना दिसला. काही दिवसांपूर्वी सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खानच्या आगामी चित्रपटाचे हैदराबाद येथे चित्रण सुरू असताना लुलिया त्याच्यासोबत होता, पण नंतर सुरू झालेल्या या वादामुळे तिने आपली बॅग भरून थेट आपला देश गाठला.

Leave a Comment