मनाला थंडावा देणारी शिवपुरी

शिवपुरी – मध्य प्रदेशात ग्वाल्हेरपासून १२० कि.मी. अंतरावर शिवपुरी हे अतीशय रम्य ठिकाण वसलेले आहे. ग्वाल्हेरचे संस्थानिक शिंदे यांनी आपली उन्हाळ्यातली राजधानी म्हणून शिवपुरी हे शहर वसविले आणि विकसित केले आहे. मुळात मोगलांनी निर्माण केलेल्या काही बागांचे पुनरुज्जीवन आणि काही महालांचे नितांत सुंदर बांधकाम करून शिंदे घराण्याने शिवपुरीचे शिल्प घडवले आहे. मध्य प्रदेशात थंड हवेची अनेक ठिकाणे आहेत. परंतु शिवपुरीचे सौंदर्य काही वेगळेच आहे. रेल्वेने किंवा विमानाने ग्वाल्हेरपर्यंत गेल्यानंतर सडकेने शिवपुरीपर्यंत जाता येते.
Madhav-National
शिवपुरीत पोचतो तेव्हा प्रवासातल्या उष्णतेने तप्त झालेल्या डोळ्यांना शिवपुरीतल्या हिरवळीचे दर्शन मोठा दिलासा देऊन जाते आणि थकल्या भागलेल्या जिवाला आराम मिळतो. शिवपुरीमधील प्रेक्षणीय स्थळात माधव नॅशनल पार्क प्रामुख्याने समाविष्ट आहे. १५६ चौरस कि.मी. क्षेत्रातील या पार्कमध्ये लहानशा टेकड्या, निळ्याशार पाण्याची सरोवरे, छोटीच परंतु दाट जंगले आणि सुंदर हिरवळीने आच्छादलेली मैदाने यांचा समावेश आहे. या पार्कमध्ये चिंकारा, चितळ, नीलगाय, कोल्हा, काळे बदक, बाराशिंगी हरिण असे अनेक जंगली प्राणी मुक्तपणे वावरताना दिसतात. पूर्वीच्या काळी या प्राण्यांची शिकार होत असे, पण आता मात्र त्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे बाहेरचे काही प्राणी या पार्कमध्ये आलेले आहेत.
Madhav-National1
चांदपाटा हा या पार्कचा भाग म्हणजे पक्षी अभयारण्य आहे आणि त्यात अनेक प्रकारचे पक्षी पहायला मिळतात. गुलाबी दगडांपासून बनवलेला माधव विलास पॅलेस हा या गावातला छोटा राजवाडा तर शिंदे घराण्याच्या वैभवशाली साम्राज्याचे प्रतिक आहे. गावात एक जुना छोटा किल्ला सुद्धा आहे. त्याशिवाय सख्य सागर बोट क्लबमध्ये बोटीतून प्रवास करता येतो. या बोटींच्यावेळी अनेक दुमिळर् जलचर प्रत्यक्षात बघायला मिळतात.

Leave a Comment