कॅनडातल्या रस्त्याला महात्मा गांधी यांचे नाव

टोरांटो – भारताच्या स्वातंत्र्याला ६७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॅनडातल्या एका रस्त्याला महात्मा गांधी यांचे नाव देण्यात आले आहे. कॅनडातील विनिपेग या शहरात हे रस्त्याचे नामकरण करण्यात आले. कॅनडातल्या मानिटोबा या प्रांताची राजधानी असलेल्या या शहरातील कॅनॅडियन म्युझियम ऑफ ह्युमन राईटस् या वस्तुसंग्रहालयाकडे जाणार्‍या रस्त्याला गुरूवारी महात्मा गांधी मार्ग असे नाव देण्यात आले.

हे वस्तू संग्रहालय माणसा माणसातले सामंजस्य वाढवण्याच्या हेतूने स्थापित करण्यात आले आहे आणि महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात हेच कार्य केलेले आहे म्हणून त्यांचे नाव या मार्गाला देण्यात येत आहे असे विनिपेगचे महापौर सॅम कॅट्झ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विनिपेग महापालिकेत देवी शर्मा हे भारतीय उद्योजक नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ते या नामकरण कार्यक्रमाला हजर होते. शिवाय या शहरात महात्मा गांधी सेंटर फॉर कॅनडा ही संस्था आहे. तिचे अध्यक्ष के. दक्षिणामूर्ती हे आणि अनेक भारतीय तिथे हजर होते.