रुपयाची घसरण, आता ६२ रुपये

नवी दिल्ली – रुपयाची घसरण मागील पानावरून पुढे जारी राहिली. शुक्रवार दि. १६ ऑगष्ट रोजी रुपया एका डॉलरला ६२ रुपये असा घसरला. सरकार रुपयाची घसरण रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाही ही घसरण जारी राहिल्याने अर्थतज्ज्ञही चकित झाले आहेत. सरकारच्या आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांना छेद देत रुपया घसरतच राहिला आणि डॉलर मजबूत होत राहिला. सरकारने योजिलेले काही उपाय खालीलप्रमाणे आहेत.

भारतातले अनेक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्याऐवजी परदेशात करीत आहेत. त्यांचा भारताबाहेर जाणारा पैसा देशातच रहावा म्हणून सरकारने कालच देशाबाहेर जाणार्‍या पैशांवर बंधने घातली. रुपया घसरण्याचे एक मोठे कारण म्हणजे सोन्याची मोठी आयात. ती कमी व्हावी यासाठी सोने, प्लॅटिनम आणि चांदी या तीन मौल्यवान धातूंवर सरकारने आयात शुल्क वाढवले. गेल्या आठ महिन्यांत अशी तिसरी वाढ करीत हे आयात शुल्क दहा टक्के करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेनेही सोन्याच्या आयातीवर काही बंधने घातली आहेत.

आपल्या देशातले परकीय चलन प्रामुख्याने सोने आणि पेट्रोल, डिझेेल यावर खर्च केले जाते. म्हणून सोन्याच्या सोबतच या इंधन तेलांवरही काही उपाय करण्यात आले आहेत. भारताशी तेलाचे व्यवहार करताना चलन म्हणून रुपया स्वीकारण्यात इराणने मान्यता दिली आहे. म्हणजे शक्य तेवढे तेल इराणकडून घेतले तर आपले डॉलर वाचणार आहेत म्हणून आता अधिकाधिक तेल इराणकडून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तरीही डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे.