गुडगाव – भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिलीपसिंग जुदेव यांचे निधन होताच त्यांच्या पत्नी माधवी देवी यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांच्या पाठोपाठ आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न फसला आता त्यांच्यावर हरियाणातल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिलीपसिंग जुदेव हे छत्तीसगडमधले असून बिलासपूर या आदिवासी लोकसभा मतदार संघातून श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले होते. ६४ वर्षांचे दिलीपसिंग जुदेव यांना यकृताचा विकार होता आणि त्यांच्या मूत्रपिंडातही संसर्ग झाला होता. गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर गुडगावच्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच त्यांचा अंत झाला.
माजी मंत्र्याच्या मृत्यूनंतर पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
बुधवारी दुपारी त्यांना मृत घोषित करण्यात आले. परंतु रात्री उशिरा त्यांच्या पत्नी माधवी (वय-६१) यांना मृत्यूची कल्पना देण्यात आली. त्यावेळी त्या दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी होत्या. त्याही आजारी असल्यामुळे त्या गुडगावला गेल्या नव्हत्या. त्यांना आपल्या पतीच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
भल्या सकाळी त्यांनी हे कृत्य केले. परंतु कोणाला त्याचा पत्ता लागला नाही. साडेदहाच्या सुमारास त्यांच्या नोकराला संशय आल्यावरून त्याने घरच्या लोकांना कल्पना दिली आणि हा प्रकार उघड झाला. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पोटात गेलेल्या झोपेच्या गोळ्या काढून टाकण्यात आल्या. त्यामुळे त्या बचावल्या.