फिलिपाइन्सला भूकंपाचा धक्का

मनिला – फिलिपाइन्सच्या पूर्व समुद्र किनार्‍याला शुक्रवारी पहाटे (दि. १६ ऑगष्ट) भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का ७.६ रिश्‍चर एवढ्या तीव्रतेचा होता. भूकंपाने देशात घबराट तर निर्माण झालीच पण या धक्क्या पाठोपाठ त्सुनामी लाटा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने घबराटीत भर पडली. नंतर मात्र त्सुनामीची शक्यता नसल्याचा खुलासा करण्यात आला. फिलिपाइन्सच्या हवामान खात्याने हा इशारा देताना आशिया खंडाच्या बर्‍याच भागांत या लाटांचा उपद्रव जाणवेल असे म्हटले असल्याने शेजारच्या देशांतही लोकांत भीतीचे वातावरण पसरले होते.

त्सुनामी वॉर्निंग स्टेशनने हा इशारा देताना या त्सुनामी बाबत इंडोनेशिया, तैवान, पापुआ न्यू गिनिया, जपान, उत्तर मेरियन्स या देशांनाही सावधानता बाळगायला सांगितले होते. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर काही मिनिटांतच त्सुनामी येत नसल्याची खात्री पटली पण जपानमध्ये त्सुनामी संबंधीचे उपाय योजण्याची तयारी सुरू होती आणि तासाभराने पूर्ण देशाला आलबेल असल्याचे सांगण्यात आले.

अमेरिकेतही या धक्क्याची नोंद झाली. अमेरिकेच्या भूकंप नोंदणार्‍या प्रयोगशाळेत या भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्‍चर एवढी नांेंदण्यात आली होती पण नंतर तिच्यात दुरुस्ती करण्यात आली आणि ती ७.६ रिश्‍चर असल्याचे स्पष्ट करण्यात आले.