बंगळुरू – भारतीय अंतराळवीरासह चंद्रावर अवकाश यान पाठविण्याची भारतीय शास्त्रज्ञांची योजना लांबणीवर पडण्याची शक्यता असून इसवी सन २०१७ पर्यंत तरी ती राबविली जाण्याची शक्यता दिसत नाही. भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) या संघटनेचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी पत्रकारांशी बोलताना हे सूचित केले. २००५ च्या सुमारास भारतीय अंतराळवीर लवकरच अंतराळात गेलेला दिसेल असे जाहीर करण्यात आले होते. २००२ सालपासून या दिशेने काही संशोधन झाल्याचेही सांगण्यात आलेले होते. परंतु डॉक्टर राधाकृष्णन यांनी पत्रकारांशी बोलताना त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले मात्र अंतराळवीरासह हे अंतराळ यान अवकाशात कधी जाईल हे सांगण्यास नकार दिला.
चंद्रावर भारतीय अंतराळवीर : योजना लांबणीवर
भारतीय अंतराळवीराला अवकाशात जाता यावे यादृष्टीने काही विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे आणि त्यासाठी आपले भरपूर प्रयत्न सुरू आहेत असे सांगतानाच डॉ. राधाकृष्णन यांनी बाराव्या पंचवार्षिक योजनेत (२०१२ ते १७) तरी ते शक्य होणार नाही असे स्पष्ट केले. याचाच अर्थ २०१७ नंतरच भारताची ही महत्त्वाकांक्षी योजना साकार होणार असे दिसत आहे.
२००६ साली या दृष्टीने काही तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु तूर्तास तरी हा विषय प्राधान्याचा नाही असे डॉ. राधाकृष्णन यांनी आता म्हटले आहे. या मागे तंत्रशास्त्रीय कारणे आहेत की आर्थिक कारणे आहेत याचा उलगडा अजून तरी झालेला नाही. या भारतीय अंतराळवीराला पूर्णपणे भारतीय बनावटीच्या अंतरिक्ष यानातून अवकाशात पाठवायचे असेल तर त्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी वाद उपस्थित केला होता आणि या मोहिमेतून फार काही साध्य होणार नसेल तर एवढा खर्च करायचाच कशाला अशा शंका उपस्थित केल्या होत्या. त्याचा परिणाम झाला आहे की काय याबाबत डॉ. राधाकृष्णन यांनी काहीही स्पष्टपणे सांगितले नाही. पण भारतीयाचा अंतरिक्ष प्रवास २०१७ सालपर्यंत तरी शक्य नाही हे मात्र स्पष्ट झाले आहे.