कानपूर – उत्तर प्रदेशातल्या अलिगढ जिल्ह्यातल्या एका गावात स्वातंत्र्य दिनानिमित्त वाटण्यात आलेल्या बिस्किटांतून विषबाधा झाल्यामुळे १२ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हर्दुनगंज भागातल्या ज्ञानदीप शिशू विहार या शाळेत हा प्रकार घडला. या प्रकाराची प्राथमिक चौकशी करण्यात आली तेव्हा ही बिस्किटे मुदत संपलेली असल्याचे आढळून आले. या प्रकाराचा अधिक तपास करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
उत्तर प्रदेशात विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा
या चौकशी नंतर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या विरोधात नजिकच्या पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानंतर तिथे मुलांना ही बिस्किटे वाटण्यात आली पण ती खाल्ल्यानंतर त्यातल्या काही मुलांचे पोट दुखायला लागले तर काही मुलांना उलट्या व्हायला लागल्या. त्यामुळे त्यातल्या १२ मुलांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्या जीवाला धोका नसल्याचे सांगण्यात आले.
ही बातमी समजताच अनेक पालकांनी दवाखान्यात धाव घेतली. पोलीसही आले पण काही तासांनंतर या सर्व मुलांना उपचार करून घरी पाठवण्यात आले. पंंडित दीनदयाळ रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. शाळांत दिल्या जाणार्या खाद्यांतून विषबाधा होण्याचे अनेक प्रकार नित्य समोर येत असल्याने अशा काही घटना घडल्या की लोकांत घबराट पसरायला लागली आहे.