कैरो – इजिप्तमध्ये सुरू असलेल्या रक्तलांच्छित संघर्षात आता भर पडणार आहे कारण कालच्या गोळीबारात ५२५ लोक मारले गेल्याने पदच्युत राष्ट्राध्यक्ष महंमद मोर्सी यांच्या समर्थकांनी आता संतप्त मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. गेल्या सात जुलैपासून या समर्थकांनी मोर्सी यांना पुन्हा अध्यक्ष करावे या मागणीसाठी सरकारी कचेर्यांसमोर निदर्शने सुरू ठेवली आहेत. त्यांनी ही निदर्शने संपवावीत यासाठी सरकारने त्यांना अनेकदा इशारे दिले पण मोर्सी समर्थकांनी त्यांना प्रतिसाद तर दिला नाहीच पण उलट राजधानी कैरो सोबत इतरही काही शहरांत या निदर्शनाचे लोण पसरले.
शेवटी सरकारने १५ ऑगष्ट रोजी या निदर्शकांवर गोळीबार केला त्यात ५२५ निदर्शक ठार झालेे. या प्रकाराने संतप्त ्रझालेल्या निदर्शकांनी आता अँगर मार्च अर्थात संतप्त मोर्चा काढण्याचे ठरविले असून त्यांत लाखो लोक सामील होणार आहेत. मोठया प्रमाणावर होणार असलेले हे प्रदर्शन दडपून टाकण्यास सरकारही आता सज्ज झाले आहे. येत्या काही दिवसांत लष्कराचा पाठींबा असलेल्या या सरकारने ही निदर्शने दाबून टाकण्यासाठी रणगाडेही आणले आहेत. त्यामुळे इजिप्तमधील अराजकांत आता मोठा रक्तपात होण्याची भीती आहे.
लष्कर प्रमुख जनरल अब्देल फतह अली शिशी यांनी निदर्शकांना अजूनही आपल्या या मोर्चाचा फेरविचार करावा असे आवाहन केले आहे. पण मुस्लिम ब्रदरहूड संघटनेच्या मोर्सी समर्थकांनी आपला निर्धार कायम असल्याचे म्हटले आहे. सरकार ही निदर्शने दडपून टाकण्याचा जेवढा प्रयत्न करीत तेवढ्या जनतेच्या भावना उफाळून येतील असे या संघटनेने म्हटले आहे. इजिप्तमध्ये ख्रिश्चनांच्या संंघटनांनी मुस्लिम ब्रदरहूडच्या विरोधात सरकारला मदत करायला सुरूवात केल्याने तर या संघर्षाला वेगळेच वळण लागले आहे.