सायना आणि सिंधू यांच्यात आज लढत

नवी दिल्ली – भारताच्या दोन अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या इंडियन बॅडमिंटन लीगच्या (आयबीएल) साखळीत गुरुवारी लढत होणार आहे. सिंधू आणि सायनामधील प्रतिष्ठेची लढत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोघींपैकी प्रत्यक्ष कोर्टवर कोण बाजी मारते, याची सर्वाना उत्सुकता आहे.

नवी दिल्लीच्या डीडीए बॅडमिंटन आणि स्क्वॉश स्टेडियमवर प्रथम सायना नेहवालच्या नेतृत्वाखालील हैदराबाद हॉटशॉट्स सिंधूच्या कर्णधारपदाखालील अवधे वॉरियर्सशी (लखनौ) दोन हात करतील. सायनाच्या संघात इंडोनेशियाचा तौफिक हिदायत, भारताचा अजय जयराम आणि तरुण कोना, मलेशियाचा गोह शेम आणि लिम खिम वाह तसेच भारताची युवा बॅडमिंटनपटू प्रज्ञा गद्रे आणि शुभंकर डेचा समावेश आहे.

जागतिक स्पर्धेतील ऐतिहासिक कांस्यपदक विजेत्या सिंधूमुळे अवधे संघही मजबूत वाटतो. सिंधूच्या संघात मलेशियाचा चोंग वी फेंग, थायलंडची सॅपसिरी टेइरॅटॅनचाइ तसेच भारताच्या गुरुसाइदत्त आणि श्रीकांत ही युवा जोडगोळी आहे.

दुसरीकडे मुंबई मास्टर्ससमोर बांगा बीट्सचे आव्हान आहे. मुंबई संघातून मलेशियाचा अव्वल बॅडमिंटनपटू ली चोंग वी, डेन्मार्कचा टिने बाउन असे ‘स्टार’ बॅडमिंटनपटू खेळत आहे. पी. सी. तुलसी, प्रणव चोप्रा या युवा बॅडमिंटनपटूंमुळे दुसरी फळीही मजबूत वाटते. बांगा बीट्सचे नेतृत्व पी. कश्यप करत आहे. त्याच्या संघात हाँगकाँगचा हु युन, डेन्मार्कचा कॅर्स्टन मॉगेनसेन अशा आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध बॅडमिंटनपटूंसह अक्षय देवलकर, अपर्णा बालन आणि अरविंद भट अशा भारतातील उदयोन्मुख बॅडिमटनपटूंचा समावेश आहे.

Leave a Comment