पाकला सडेतोड उत्तर कधी देणार- मोदी

भूज: पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या अभिभाषणातून पाकिस्तानला कडक इशारा दिला नाही. पाकला सडेतोड उत्तर देण्याची गरज असून, हे उत्तर सरकार कधी देणार असा सवाल गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि यूपीए सरकारसमोर उपस्थित केला.

भूजमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या ध्वजारोहणानंतर ते बोलत होते. सध्यास मी जिथे उभा आहे (भूज) तिथून पाकिस्तानमध्ये लगेच आवाज पोहोचतो. मात्र मनमोहन सरकारचा आवाज दिल्लीतून पाकिस्तानला पोहोचतच नाही, असे टीकास्त्रर मोदीं यांनी सोडले. स्वातंत्र्याच्या लढाईत गुजरातींचे महत्वाचे योगदान आहे. मात्र पंतप्रधानांना आज गांधी आणि नेहरू घराण्यांचीच आठवण आली. त्यांना लालबहाद्दूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल यांची आठवण का नाही झाली, असा सवालही मोदींनी केला. देशात आदी मामा-भाचे मग आता सास, बहू आणि दामादची मालिका सुरू आहे, असं म्हणत मोदींनी गांधी घराण्यावर टीकास्त्र सोडले.

राष्ट्रपतींच्या भाषणाने देशाच्या सद्यस्थितीचं वर्णन केले. देशाला भ्रष्टाचाराने ग्रासले आहे. पण पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या भावनांचा आदर केला नाही, असं मोदींनी नमूद केले. सध्या देशात गरिबांना ३ रू किलोने तांदूळ आणि २ रु. किलोने गहू मिळतो. मग अन्न सुरक्षा विधेयकाने सरकार नवे काय साधणार आहे?. या विधेकामुळे २५ किलो धान्य मिळेल. पण गुजरातमध्ये आम्ही ३५ किलो देतो, असा दावा मोदींनी केला.

गुजरातचा विकास केल्याने देशाचाही विकास होईल. गुजरातचा जो विकास झाला, त्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांचे योगदान होते. गुजरातमध्ये बेरोजगारी कमी आहे. दूध उत्पादक क्षेत्रात गुजरात आघाडीवर आहे. तसंच विकासात पुढे असलेल्या आमच्या राज्याचा गौरव खुद्द पंतप्रधानांनीच केल्याचं मोदींनी सांगितले. सर्वांचे लक्ष पंतप्रधानाच्या आणि मोदींच्या भाषणाकडे लागून राहिले होते.