नवी दिल्ली- काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. आगामी काळात हल्ले आणि दहशतवाद्यांच्या कुरापत यापुढे खपवून घेणार नाही. पाकिस्तानच्या कारवायांना यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधताना दिला.
भारताच्या ६७व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ पार पडला. यावेळी संपूर्ण देशवासीयांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. ते म्हदणाले ‘सीमेवरील कारवाया पाकिस्तानने थांबवल्या पाहिजेत. पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात आमचे वीर जवान शहीद झाले. अशा घटना भविष्यात पुन्हा घडणार नाहीत, याची सर्व ती खबरदारी आम्ही घेतली आहे. पाकिस्तान भारतविरोधी दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानने या गंभीर प्रश्नाकडे त्वरीत लक्ष देऊन कारवाई करायला हवी.’
उत्तराखंडमधील प्रलयात बळी पडलेल्या नागरिकांना पंतप्रधानांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. मुंबईत नौदलाच्या पाणबुडीला झालेला अपघात आणि १८ कर्मचा-यांच्या मृत्युच्या शक्यतेने तीव्र धक्का बसल्याचे पंतप्रधान म्हणाले. तसेच यूपीए सरकारने गेल्या दशकात केलेल्या वाटचालीचा आढावा यावेळी घेतला. देशातील ८१ कोटी जनतेला स्वस्त धान्य उपलब्ध होण्यासाठी अन्न सुरक्षा विधेयक तातडीने लागू करण्यासाठी आपले प्राधान्य असेल, असेही पंतप्रधान यांनी यावेळी स्पष्ट केले.