पंतप्रधानांपेक्षा माझे भाषण चांगले होईल – नरेंद्र मोदीं

नवी दिल्ली – स्वातंत्र्यदिनानिमित्त लालकिल्ल्यावरून होणार्‍या पंतप्रधानांच्या भाषणाकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. पण, पंतप्रधानांपेक्षा आपले भाषण अधिक महत्त्वाचे आणि श्रवणीय असेल, असे म्हणत भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांनाच आव्हान दिले आहे.

भूज येथे झालेल्या एका सभेत युवकांना संबोधत असताना मोदींनी आपल्या भाषणाची लाल किल्ल्यावरून होणार्‍या पंतप्रधानांच्या भाषणाशी तुलना करत उद्या स्वतंत्रदिनी देशातील जनतेची नजर माझ्या भाषणावर असेल, अशी स्तुतीसुमनेे उधळली. भूज येथील लालन कॉलेज येथे मोदींचे भाषण होणार आहे. मोदींचे म्हणणे आहे की, पंतप्रधानांचे भाषण लाल किल्ल्यावरून होईल आणि माझे भाषण लालन कॉलेजच्या मैदानातून होईल.

देशातील जनता या दोन्ही भाषणातून पंतप्रधान आणि माझी तुलना करतील. पण ती तुलना असेल आश्वासन आणि प्रत्यक्ष कामावर, निराशा आणि आशेवर तुलना होईल. उद्या पंतप्रधान आपल्या भाषणातून यूपीए सरकारचा लेखाजोखा हिशेब मांडतील पण मी आजपर्यंत केलेल्या विकासकामाचा आढावा देईल, असेही मोदींनी म्हटले आहे. 2001 मध्ये मोदी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्यस्तरीय स्वातंत्रदिनी कार्यक्रमात हजेरी लावत आले. पण यावेळी स्वातंत्र दिनाचा समारोह कच्छ जिल्ह्यातील मुख्य कार्यालयाजवळील लालन कॉलेज कॅम्पस इथं होणार असून मोदींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

मोदींच्या या आव्हानावर काँग्रेसचे नेते आणि माहिती आणि प्रसार मंत्री मनीष तिवारींनी खेद व्यक्त केला. गेल्या 66 वर्षांपासून भारताचे पंतप्रधान जेंव्हा लाल किल्ल्यावरून भाषण करतात त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता टीका,टिप्पणी,प्रतिक्रिया देत नाही. पण पहिल्यांदा असं कुणीतरी खटाटोप करत आहे, हे अत्यंत दुर्देवी असून मोदींनी आपलं विधान मागे घ्यावं अशी मागणीही तिवारींनी केली.