दुबळ्या हातात भारी शस्त्रे

गेल्या आठवडाभरात अरिहंत पाणबुडी आणि आयएनएस विक्रांत ही विमानवाहू लढाऊ नौका यांच्या रुपाने भारत सरंक्षण सिध्दतेत किती आघाडीवर आहे याचे दर्शन घडले आहे. मात्र दुसर्‍या बाजूला एवढी शस्त्रसज्जता असताना देशाचे नेतृत्व दुबळे असल्यामुळे ही शस्त्रे केवळ दाखवण्यापुरतीच कशी आहेत. हेही पाकिस्तानच्या हल्ल्यांच्या रूपाने दिसून येत आहे. एकाच वेळी होणारे हे सज्जतेचे दुबळ्या मनःस्थितीचे दर्शन मनाला वेदना देणारे आहे. तीन दिवसांपूर्वी अरिहंत या आण्विक पाणबुडीवरची अणुभट्टी कार्यरत झाली. सध्याच्या जगामध्ये जर युध्द झाले तर पाणबुड्या आणि क्षेपणास्त्रे यांना विलक्षण महत्त्व येणार आहे. आज अमेरिका आणि रशिया यांच्याकडच्या शस्त्रागारामध्ये ६० टक्के शस्त्रे ही आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या रूपात जमा झालेली आहेत. भारताच्या अरिहंत या पाणबुडीवरून के १५ हे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येणार आहे. म्हणजे अरिहंत पाणबुडी हीच मुळात अणुशक्तीवर चालणार आहे आणि तिच्यावरून शस्त्रूच्या प्रदेशात अण्वस्त्र नेऊन फेकणारे आंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येणार आहे.

भारताने हे क्षेपणास्त्र आणि पाणबुडी या दोन्हींची सिध्दता करून ती प्राप्त करणार्‍या मोजक्याच सात देशांमध्ये शिरकाव केला आहे. तिच्यावरची अणुभट्टी कार्यरत झाली तेव्हा पंतप्रधानांनी तंत्रज्ञांचे अभिनंदन केले. लगेच दोन दिवसांनी भारताने संरक्षण सिध्दतेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. पूर्णपणे भारतीय बनावटीची ४० हजार टनाची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू लढाऊ बोट तयार करून तिचे जलावतरण केले. हे केवळ बोटीच्या रूपाने टाकलेले पाऊल नाही. तर स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. कारण ही बोट पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. भारताने यापूर्वी ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र आणि पृथ्वी ५ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित करून केवळ चीनच नव्हे तर अमेरिकेला सुध्दा अस्वस्थ करून टाकलेले आहे. भारताची युध्द सज्जता वाखाणावी अशी आहे. विशेषतः गेल्या दहा वर्षात भारताने क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रामध्ये केलेली प्रगती जगाला स्तिमित करणारी आहे. पण भारताची अवस्था मात्र विचित्र झालेली आहे. दोन्ही हातात तलवारी असलेल्या परंतु ती चालवायची कशी हे माहीत नसलेल्या शेंदाड शिपायासारखी आपल्या देशाची अवस्था झालेली आहे. आपल्याकडे शस्त्रे भरपूर आहेत. शस्त्रांच्या निर्मितीत आपण स्वावलंबी होत आहोत, आपली मारकशक्ती वाढत आहे. परंतु युध्द न करण्याच्या आपल्या मनःस्थितीने विकृतीत जमा व्हावी अशी खालची पातळी गाठलेली आहे.

शस्त्रसज्जता ही पहिल्यांदा आघात करण्यासाठी नसते तर शत्रूला धाक वाटावा म्हणून असते. मात्र आपल्या शस्त्र सज्जतेने धाक न बसून आपला शत्रू वळवळ करायला लागला तर पहिला आघात न करण्याचे तत्व गुंडाळून ठेवून जबरदस्त आघात करावाच लागेल. अन्यथा आपल्या देशातल्या लोकांचा आत्मविश्‍वास डळमळीत व्हायला लागेल. एवढी वैचारिक तयारी असणारे नेते आपल्या देशाला लाभलेले नाहीत. हे आपले मोठे दुर्दैव आहे. पहिला आघात करणे म्हणजे आततायीपणा ही गोष्ट खरीच आहे आणि गांधींच्या भारतात नक्कीच खरी आहे. परंतु आपल्यावर आघात होत असताना आपण प्रत्याघात केला तर तो आततायीपणा ठरत नाही. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने ते आपले कर्तव्यच ठरते. गेल्या दोन महिन्यापूर्वी दोघा भारतीय जवानांची हत्या करून त्यांचे शीर पळवण्यात आले. त्यावेळी भारत सरकारने पाकिस्तानला इशारा दिला. भारताची शांतता आणि संयम याला दुबळेपणा समजू नका असा सज्जड दम भारताने दिला. परंतु त्याचा कसलाही परिणाम पाकिस्तानवर झाला नाही. गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा पाकिस्तानने केवळ हल्लाच केला असे नाही तर हल्ल्यांचे सत्र सुरू केले. तुमचा संयम म्हणजे दुबळेपणाच आहे हे जणू पाकिस्तानने आपल्याला सिध्दच करून दिले आहे. भारत-पाकिस्तान युध्द झाले तर आपली औद्योगिक प्रगती ५० वर्षे मागे जाईल असले अवाजवी सल्ले काही मंडळी द्यायला लागली आहेत.

युध्दाचे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतात ही गोष्ट खरी आहे परंतु पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने युध्द केलेच तर आपली औद्योगिक प्रगती ५० वर्षे मागे जाईल एवढा काही पाकिस्तान बलवत्तर नाही. परंतु आपल्या देशातले तज्ञ भलतीच अतिशयोक्त विधाने करत असतात. आता सर्व साधारण भारतीयांच्या मनामध्ये पाकिस्तानविषयी प्रचंड चीड निर्माण झाली आहे आणि तिला प्रतिसाद देऊन भारतीय जनता पार्टीनेही तशीच मागणी करायला सुरूवात केली आहे. परंतु पाकिस्तानला धड शिकविण्याची हिंमत नसणारे कॉंग्रेसचे नेते या मागणीला आणि या संतापाला पक्षीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात असतानासुध्दा असे हल्ले झाले होते, त्यावेळी भाजपाने पाकिस्तानला चोख उत्तर दिले नाही, आता मात्र भाजपा नेते तशी मागणी करत आहेत, हा भाजपाचा दुटप्पीपणा आहे अशी टीका कॉंग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. परंतु ती भारतातल्या सर्वसामान्य लोकांना निरर्थक वाटत आहे. भाजपाच्या सरकारने पाकिस्तानला धडा शिकवला नव्हता. म्हणून कॉंग्रेसच्याही सरकारने तसा तो शिकवू नये असे म्हणणे काही तर्कशुध्द नाही. धडा कोण शिकवलाय याला महत्त्व नाही पण पाकिस्तानकडून आपल्यावर होणारे हल्ले अपमानास्पद वाटत आहेत त्याला भारत देश प्रत्युत्तर देणार की नाही हा मुख्य प्रश्‍न आहे. हातात नुसती तलवार असून भागत नाही. ती तलवार बाळगणारे हात मजबूत हवेत आणि त्या हाताच्या मागे एक मजबूत मन हवे. ते मजबूत मन नाही ही खरी अडचण आहे.

Leave a Comment