तिरुपती देवस्थानात शुकशुकाट

हैदराबाद – आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळा केल्याच्या निषेधार्थ उर्वरित आंध्र प्रदेशात पाळण्यात आलेल्या बंदचा एक भाग म्हणून काल तिरुमल-तिरुपती देवस्थानच्या बस चालकांनी संप केला. त्यामुळे तिरुपती-बालाजीच्या दर्शनाला काल बर्‍याच भाविकांना येता आले नाही. दररोज सुमारे ७० हजार लोक बालाजीचे दर्शन घेतात आणि हे टेकडीवरचे देवस्थान भक्तांच्या येण्या-जाण्याने सदैव गजबजलेले असते. पण काल काही हजार लोकांना सुद्धा दर्शन घेता आले नाही.

तिरुपती शहर ते तिरुमल देवस्थान (बालाजी) या अंतरावर भाविकांची वाहतूक करणार्‍या काही खास गाड्या आहेत आणि हा आंध्र प्रदेश परिवहन महामंडळाचा वेगळा विभाग आहे. या विभागातल्या चालक-वाहकांनी काल संप पुकारला. या मार्गावर दररोज तीन हजार फेर्‍या होतात. त्या ठप्प झाल्या. त्यामुळे तिरुपतीत येऊन थांबलेल्या हजारो भाविकांना देवस्थानपर्यंत पोचता आले नाही. काल या बसच्या चालक-वाहकांसोबतच तिरुमल देवस्थानच्या प्रशासनात नोकरीला असलेल्या १२ हजार कर्मचार्‍यांनी सुद्धा संप पुकारला.

वाहतुकीची एक सोय बंद झाली तरी काही भाविकांनी खाजगी वाहनांनी बालाजीच्या मंदिरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. या वाहनांनी लोकांना अवाच्या सवा दर लावून त्यांची लूट केली. परंतु तरी सुद्धा सुमारे १२ हजार भाविक मंदिरापर्यंत येऊ शकले. त्यामुळे दर्शन मंडपात गर्दी नव्हती. देवस्थानच्या प्रशासनाच्या मदतीशिवाय या लोकांना आरामात दर्शन घेता आले. गेल्या ३० वर्षात भाविकांच्या संख्येत एवढी घट होण्याची ही पहिलीच वेळ होती.

Leave a Comment