
जम्मु – जम्मु काश्मीरमधील केरान व कुपवाडा भागातील सीमेवरुन घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना आज (बुधवार) लष्कराने ठार केले. मागील काही दिवसांपासून पाकच्या गोळीबाराचा सामना करत सीमारेषेवर अत्यंत सतर्क असलेल्या भारतीय लष्कराने पाक घुसखोरांचा हा प्रयत्न उधळून लावला आहे.
भारतीय सीमारेषेवरील घुसखोरीचे प्रयत्न व दहशतवादी हल्ले यांच्यामध्ये मार्च महिन्यापासून वाढ झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच उन्हाळ्यात या भागामधील बर्फ वितळायला सुरुवात झाल्याने दहशतवाद्यांना हालचाल करण्यास सोपे होते असे लष्करातील अधिकाऱ्यानी सांगितले.
गेल्या पाच दिवसांमध्ये पाकिस्तानने सतत शस्त्रसंधीचा भंग केल्याने सीमारेषेवरील वातावरण तणावाखाली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य व दहशतवादी या दोघांच्या हल्ल्यांचा सामना भारतीय सेना करत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय लष्करातील गस्त पथकामधील पाच जवानांची पाक सैन्याने हत्या केल्यानंतर सीमेवरील हिंसाचारात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवरील आजचा हा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला आहे.