पुणे, – आळंदी पंढरपूर ही वर्षभर चालणारी वारी आहे, हा सांस्कृतिक ठेवा जतन करण्याची आवश्यकता असल्याने या पालखी मार्गाच्या विकासासाठी केंद्राने दोन हजार कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि यासाठी सचिव दर्जाचा अधिकारी नेमावा, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी सचिव डॉ. सदानंद मोरे, खजिनदार दिनकर भुकेले शास्त्री, डॉ.अभय टिळक, बापूमहाराज देहूकर, भानुदास महाराज ढवळीकर, राजाभाऊ चोपदार उपस्थित होते.
आळंदी ते पंढरपूर या रस्त्यावरील पालखीतळ आरक्षित करून, पालखी मार्गाचे चौपदरीकरण न करता सहापदरीकरण करण्यात यावे कारण या ठिकाणी राज्यभरातील सर्व पालख्या एकत्र येतात त्यामुळे वारकर्यांची संख्या वाढलेली असते. संतांनी दिलेला मानवतावादी विचार आणि शिकवणीचा येणार्या नवीन पिढीवर संस्कार होणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात संत वाड्.मयाचा समावेश करणे, तसेच संत वाड्.मय देश आणि जगभरात पोहचावे यादृष्टीने शासनस्तारावर प्रयत्न करावेत असे पाटील यांनी सांगीतले.
जादुटोणा विरिधी कायद्याला वारकर्यांचा विरोध नसल्याचे सांगत पाटील म्हणाले, धर्मातील अघोरी प्रथांना वारकर्यांचा नेहमीच विरोध राहिला आहे. अनिसची मागणी असलेल्या कायद्याला आमचा विरोध नसून त्यातील काही तरतुदींना विरोध आहे. आमचे आक्षेप आम्ही नोंदवले असून सुधारीत विधेयकाचा मसुदा शासनाने आम्हाला अद्याप दिलेली नाही, यामुळे अनिस वारकर्यांवर जे आरोप करत आहे ते बिनबुडाचे आहेत.