रात्र वैर्‍याची आहे

जम्मू- काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तान रोज एक कुरापत काढत आहे आणि युद्धाचे ढग जमा होत आहेत. अशा वेळी आपल्याला शत्रूशी मुकाबला करायचा असेल तर देश शांत असायला हवा. निदान सीमावर्ती प्रदेश तरी शांत असायला हवेत पण नेमक्या याच वेळी जम्मू विभागात जातीय दंगे सुरू आहेत. रात्र वैर्‍याची आहे म्हणजे नेमकी स्थिती कशी असायला हवी याचा प्रत्यय येत आहे. जम्मूच्या बहुतेक जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा दावा सरकारने केला असला तरीही या शीतप्रदेशात असंतोषाची आग धुमसत आहे. केन्द्र सरकार ही हाताळण्याच्या बाबतीत काहीही करीत नाही. गृहमंत्री आजारी आहेत आणि त्यांच्या ऐवजी संसदेत निवेदन करताना माजी गृहमंत्र्यांनी, राज्य सरकारला परिस्थिती नीट हाताळायला सांगण्यात आले असल्याचे म्हटले आहे. जातीय दंगलीच्या आगीने होरपळत असलेल्या या भागापासून थोडयाच अंतरावर पाकिस्तानने गेल्या सहा दिवसांपासून दररोज सीमा ओलांडून आत येऊन गोळीबार करायला सुरूवात केली आहे. केन्द्र सरकारने त्यांचा निषेध करण्यापलीकडे काहीही केलेले नाही त्यामुळे पाकिस्तानची भीड चेपली आहे. आता तर पाकिस्तानच्या परराष्ट्र कचेरीने कमालच केली.

भारताच्या तिथल्या प्रतिनिधीला पाचारण केले आणि भारताकडूनच सीमारेषेचे उल्लंघन होत असल्याचा उलट आरोप करून भारताचाच निषेध केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज ‘शरीफ’ यांच्या नावाचा त्यांच्या वागण्याचा काही संबंध नाही हे त्यांनी या उलट्या बोंबांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या परराष्ट्र खात्याचा आणि त्यांचा काहीही ताळमेळ नाही असे दिसते कारण पंतप्रधान पाकिस्तानी बाजूकडून हल्ले होत असल्याचे कबूल करतात आणि झालेल्या हल्ल्याबाबत खेद व्यक्त करतात पण त्यांचेच परराष्ट्र खाते हल्ले होत असल्याचे नाकारून भारतावरच उलटा आरोप करते. पाकिस्तानात कोणाचा कोणाशी मेळ नाही आणि भारताच्या खोड्या काढण्याबाबत मात्र एकमत आहे. पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तान सीमेवर तैनात असलेले आपले सैन्य भारताच्या सीमेवर आणून उभे करावे अशी मागणी केली आहे. लष्कराचा बराच मोठा दारूगोळा लाहोरमध्ये जमा करण्यात आला आहे. कोणत्याही क्षणी पाकिस्तानकडून मोठी लष्करी चढाई होईल याची शक्यता आहे. अशा वेळी आपल्याला या चढाईचे मुख्य लक्ष्य असेल अशा राज्यात अंतर्गत शांतता राखता येत नाही ही बाब आपण देेशाच्या रक्षणाबाबत किती बेफिकीर आहोत याची निदर्शक आहे.

या भागात किश्तवाड येथे रमजान ईदच्या दिवशी जातीय दंगल पेटली. ईदच्या नमाजाला चाललेल्या जमावातून आझादीचे नारे देण्यात आले आणि त्यामुळे दंगलीची ठिणगी पडली. लोक हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरले. दंगल पेटलेले गाव राज्याचे गृह राज्यमंत्री सज्जाद किचलू यांच्या मतदारसंघात आहे आणि ते या वेळी गावातच उपस्थित होते. ते ईदची नमाज अदा करून बाहेर पडले आणि स्वत:च दंगलीत सापडले. दंगल पेटली असताना पोलीस बघ्याची भूमिका घेतात अशी लोकांची तक्रार होती आणि या मागणीसाठी लोकांनी किचलू यांना घेराव केला होता. जमावाच्या मागणीला प्रतिसाद देऊन पोलिसांना वेगाने पावले टाकण्याचा आदेश देणे हे त्यांचे कर्तव्य होते पण त्यांना काहीही करता आले नाही. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आणि मंत्र्यांनीही त्यापेक्षा वेगळे काही केले नाही. खरे तर याच भागात आता केन्द्रीय राखीव पोलीस दलाच्या ६० तुकड्या आहेत पण त्यांना स्थिती हातात घेण्याचे आदेश उशीरा देण्यात आले. त्यामुळे ते संध्याकाळी आले आणि दरम्यान म्हणजे सात तास किश्तवाड शहरात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात यादवी युद्ध जारी होते. गृह राज्यमंत्र्यांची उपस्थिती अनायासेच होती तर तिथली स्थिती लवकर अाटोक्यात यायला हवी होती पण ती उलट चिघळली.

मंत्र्यांच्या अंगरक्षकाने त्यांना घेराव घालणार्‍या जमावावर स्वत:च गोळी झाडली. किचलू यांच्यावर टीकेची झोड उठली. भाजपाने तर त्यांचा राजीनामा मागितलाच पण राज्यातल्या सत्तारूढ आघाडीत भाागीदार असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनीही किचलू यांना पदावरून काढून टाकावे अशी मागणी केली. राज्याचे गृहमंत्री शहरात असताना दंगल पेटते. तो त्यांचा मतदारसंघ असतो पण त्यावर ते मंत्री आपल्या अधिकाराचा वापर करून दंगल शमविण्यासाठी स्थितीचे नियंत्रण आपल्या हाती घेण्याच्या ऐवजी आपले कर्तव्य विसरून त्या गावातून सरळ निघून जातात. अशा मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. तो घेण्यात आला आहे. पण आपल्या देशात मोठ्या पदांवर किती बेजबाबदार माणसे बसली आहेत याचे दर्शन या निमित्ताने होत आहे. या दंगलीत तिघांचा बळी गेला आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. आपल्याला दंगलीची तीव्रता तिच्यात किती लोक मारले गेले यावरून मोजण्याची सवय आहे. त्यामुळे केवळ तिघे मारले गेल्याने ही दंगल आपल्याला सौम्य वाटण्याची शक्यता आहे पण, या दंगलीत मालमत्तेची जाळपोळ मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. या भागात अतिरेक्यांचा वावर असल्यामुळे त्यांच्या बंदोबस्तासाठी ग्राम सुरक्षा दले नेमण्यात आली असून त्यांना शस्त्रे देण्यात आली आहेत. या शस्त्रांचा वापर या दंगलीत करण्यात आला आहे. शिवाय शस्त्राच्या एका दुकानाची लूट करून तिथून काही शस्त्रे लुटून तीही वापरली गेली आहेत. या दंगलीचे लोण अजून तरी काश्मीर खोर्‍यापर्यंत पोचलेले नाही पण हुरियत कॉंन्फरन्सने काश्मीर मध्ये बंदची हाक देऊन तसा प्रयत्न सुरू केला आहे ही त्यातल्या त्यात अधिक चिंतेची बाब आहे