हैदराबाद – नेल्लोरचे माजी खासदार आणि वाय.एस.आर. कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत २६ ऑगस्टपयर्र्ंत वाढविण्यात आली आहे. आपले वडील वाय.एस. राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांच्या पदाचा गैरवापर करून करोडो रुपयांची अवैध संपत्ती जमा केल्याच्या प्रकरणात जगन मोहन रेड्डी यांच्यावर विशेष सीबीआय न्यायालयात खटला जारी आहे.
२७ मे रोजी सीबीआयने त्यांना या प्रकरणात अटक केली आहे. तेव्हापासून त्यांना विविध खटल्यांमध्ये कधी न्यायालयीन तर कधी पोलीस कोठडी मिळत आहे आणि एकूण ते गेल्या तीन महिन्यांपासून कोठडीत बंद आहेत. २७ ऑगस्ट रोजी त्यांच्या कोठडीला तीन महिने पूर्ण होतील.
जगन मोहन रेड्डी हे जामिनावर कधी मुक्त होतील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कॉंग्रेस पक्षाला त्यांचे तुरुंगाच्या बाहेर येणे राजकीयदृष्ट्या बरेच महागात पडणारे आहे. कारण आंध्र प्रदेशाच्या विभाजनाच्या निर्णयानंतर उर्वरित आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांची लोकप्रियता वाढली आहे. त्यांना धडा शिकविण्यासाठी कॉंग्रेसने सीबीआयचा वापर करून त्यांच्यावर खटले गुदरले असले तरी या खटल्यांमुळे त्यांच्याविषयी जनतेत सहानुभूती निर्माण झाली आहे. त्यातच तेलंगणाच्या निर्णयाची भर पडली आहे. म्हणून जगन मोहन रेड्डी यांचे तुरुंगाबाहेर येणे राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.