चेन्नई एक्सप्रेस गल्ल्यावर धूम

मुंबई – रोहित शेट्टी निर्मित शाहरूख खानच्या चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटाने प्रदर्शनानंतरच्या तीन दिवसांतच १०० कोटी रुपयांचा गल्ला मिळवून धूम केली आहे. आजवर काही चित्रपटांचे असे विक्रम झाल्याची चर्चा चालते परंतु यापूर्वी असे विक्रम करणार्‍या चित्रपटांनी पहिल्या आठवड्यात १०० कोटींचा गल्ला मिळवलेला आहे. चेन्नई एक्सप्रेसने मात्र तीनच दिवसात ही मजल मारली. रमजान ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या चेन्नई एक्सप्रेसने रविवार अखेरपर्यंत १०० कोटी ४२ लाख रुपये मिळवले.

ही १०० कोटींची रक्कम गुरुवारच्या प्रिव्ह्यूसह आहे. त्या शोमध्ये ६.७५ कोटी, शुक्रवारी ३३.१२ कोटी, शनिवारी २८.०५ कोटी आणि रविवारी ३२.५० कोटी रुपये असा चेन्नई एक्सप्रेसचा धंदा झाला. या चित्रपटात शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या भूमिका आहेत. दीपिका आणि शाहरूख खान ओम शांती ओम् मध्ये एकत्र आले होते. पण बर्‍याच दिवसांच्या खंडानंतर ही जोडी चेन्नई एक्सप्रेसमध्ये झळकली.

शाहरूख खान याचे बरेच चित्रपट आपटले होते. पण या अपयशानंतर त्याला चेन्नई एक्सप्रेसने पुन्हा स्टार व्हॅल्यू प्राप्त झाली आहे. रोहित शेट्टीबरोबर त्याने केलेला हा पहिला चित्रपट शाहरूखसाठी अपयशाची मालिका खंडित करणारा ठरला आहे.

Leave a Comment