पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

इस्लामाबाद – भारताने भारत-पाकिस्तान दरम्यानची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी प्रदेशात गोळीबार केला, असा आरोप पाकिस्तानने केला असून या अतिक्रमणाचा निषेध नोंदण्यासाठी पाकिस्तानातल्या भारतीय वकिलातीतील भारताच्या प्रतिनिधीला आपल्या परराष्ट्र खात्याच्या कचेरीत बोलावले. भारताचे पाकिस्तानातील प्रतिनिधी गोपाळ बगले यांना सोमवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकार्‍यांनी आपल्या कचेरीत बोलावून त्यांच्याकडे, भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट येथे गोळीबार केल्याचा आरोप केला. त्याचबरोबर या गोळीबाराचा निषेधही नोंदवला.

भारतीय जवानांनी यावेळी पाकिस्तानच्या निमलष्करी दलाच्या जवानांवर गोळीबार केला, त्यांनी सियालकोट क्षेत्रातील ठाण्यांवर हल्ला केला, त्यात रावळकोट येथील एका नागरिकाचा मृत्यू झाला असे पाकिस्तानने त्यांच्या निषेध खलित्यात म्हटले आहे. गेल्या आठवडाभरात पाकिस्ताननेच भारतात अशा कारवाया केलेल्या आहेत. परंतु त्या बद्दल कसलीही खंत व्यक्त न करता पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने उलट भारतावरच आक्रमणाचा आरोप केला आहे. त्यावर पुन्हा भारताला उपदेश सुद्धा केला आहे.

२००३ साली पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली होती आणि पाकिस्तान त्या युद्धबंदीचे पालन करत आहे. परंतु भारतच युद्धबंदी पाळत नाही असा पाकिस्तानने भारतावरच उलटा आरोप केला आहे. भारताने अशा प्रकारे नियंत्रण रेषेचे वारंवार उल्लंघन केले तर पाकिस्तानला भारतातली आपली परराष्ट्र कचेरी बंद करून तिथला सारा कर्मचारीवर्ग परत बोलवावा लागेल, असा इशारा सुद्धा पाकिस्तानने दिला आहे.