पुणे, – अखिल भारतीयनाट्य परिषद, पुणे शाखेच्या निवडणुकीत सुरू असलेली नाट्यमय घडामोडींची मालिका मंगळवारीही कायम राहिली. पॅनल प्रमुख म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले माजी महपौर शांतिलाल सुरतवाला यांनी परिषद ‘समारंभ प्रिय’ असून इथे कोणत्याही प्रकारचे काम होत नसल्याचा आरोप करत निवडणुकीतून माघार घेतली.
नाट्य परिषदेची बिनविरोधकडे वाटचाल
नाट्य परिषदेची निवडणूक मध्यवर्तीच्या निवडणुकीपासून गाजावाजा करतच पार पडत असल्याने पुणे शाखेने नवा आदर्श निर्माण करावा, अशी इच्छा नाट्य वर्तुळात सगळेच बाळगून असल्याचे चित्र सध्यापर्यंत निर्माण करण्यात आले आहे. सोमवारी 37 पैकी 11 जणांनी माघार घेतल्याने परिषदेची वाटचाल बिनविरोधकडे होत असल्याचे बोलले जात असतानाच मंगळवारी त्यात आणखी भर पडली. सुरतवाला यांच्यासह अभिनेत्री ऋजुता देशमुख, लेखक, अभिनेता प्रवीण तरडे, अशोक जाधव आणि शिरिष रायरीकर यांनी आज माघार घेतली. डॉ. सतीश देसाई, शांतिलाल सुरतवाला, सुधीर मांडके व सुनील महाजन या चौघांचे पॅनल असणार, अशी नाट्यविश्वात चर्चा होती. यापैकी महाजन यांनी अर्जच भरला नाही तर सुरतवाला यांनी माघार घेतली. आता 15 जागांसाठी 21 जण रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या (बुधवार) असल्याने निवडणुकीचे नेमके चित्र तेव्हाच स्पष्ट होणार आहे.