कोहलीची अर्जुन पुरस्कारासाठी निवड

नवी दिल्ली – यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताचा डबल ट्रॅप शूटर रोंजन सोढीचं नावं क्रीडा मंत्रालयाकडे पाठवण्यात आलंय. सोढी वर्ल्ड रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. तर आपल्या बॅटिंगनं क्रिकेट जगत गाजवणार्‍या विराट कोहलीची निवड अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.  रोंजन सोढीनं भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मेडल्स मिळवून दिली आहेत. त्यामुळं त्याची खेलरत्न पुरस्काराठी निवड करण्यात आलीय. खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार समजला जातो. तर वन-डे, टेस्ट आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये कोहलीनं आपल्या बॅटिंगनं कमाल केली आहे.

त्यामुळं यंदा अर्जुन पुरस्कार मिळणार्‍या खेळाडूंमध्ये कोहलीचा समावेश होणार आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुकतंच बॅडमिंटनच्या विश्व चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू पी. व्ही. सिंधू हिची सुद्धा अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. सिंधूच्या व्यतिरिक्त 2010च्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत रेकॉर्डसह कांस्य पदक जिंकणारा रंजीत माहेश्वरी आणि गोल्फ खेळाडू गगनजीत भुल्लर यांचीही यंदा अर्जुन पुरस्कारासाठी निवड झालीय.  मागील वर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये अपयशी ठरलेला सोढी जगातला नंबर एकचा माजी खेळाडू आहे. गेल्या वर्षी आशियाई खेळांमध्ये डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण पदकाव्यतिरिक्त राष्ट्रकुल स्पर्धेत रजत पदकही जिंकलं होतं. क्रीडा मंत्रालयाकडून सोढीच्या नावाला परवानगी मिळताच, खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित होणारा सोढी हा सातवा नेमबाज ठरेल.  विशेष म्हणजे लागोपाठ तीन वर्षापासून खेलरत्न पुरस्कार नेमबाजाला मिळतोय. 2011मध्ये हा पुरस्कार नेमबाज गगन नारंगला मिळाला होता. तर मागील वर्षी विजय कुमारला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

Leave a Comment