आयपीएस अधिकारी पांडे यांचे न्यायालयासमोर आत्मसमर्पण

अहमदाबाद – सर्वोच्च न्यायालयाने पांडे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज सोमवारी फेटाळला होता. जामीनअर्ज फेटाळल्यानंतर लगेचच मंगळवारी आयपीएस अधिकारी पी.पी. पांडे यांनी सीबीआय न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. पांडे हे इशरत जहाँ हिच्या बनावट चकमक प्रकरणातल्या आरोपींपैकी एक आहेत.

पी.पी. पांडे हे १९८२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. फरार म्हणून घोषित केल्या गेलेल्या पांडे यांना अटकपूर्व जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला होता. तसेच इशरत जहाँ हिच्या बनावट चकमकप्रकरणी त्यांच्यावर अजामीनपात्र वारंटही बजावण्यात आले होते. न्यायालयासमोर उपस्थित न राहिल्याने विशेष सीबीआय न्यायालयाने पांडे यांना फरार घोषित केले होते. १५ जून २००४ रोजी मुंबईच्या एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणा-या इशरत, प्रणेश पिल्लई, अमजद अली राणा आणि जीशान जोहर यांना अहमदाबादजवळचं गुन्हे शाखा अधिका-यांनी ठार केले होते. त्यावेळी पी. पी. पांडे अहमदाबादचे संयुक्त पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते.

याप्रकरणात गुजरातच्या सात पोलीस अधिका-यांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सीबीआयने त्यांच्याविरुद्ध हत्या तसेच कट रचणे यांसारखे गंभीर आरोप दाखल केले आहेत. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे.

Leave a Comment