विविधतेचे विहंगम दर्शन मारखा व्हॅली

लडाख – जम्मू काश्मिरच्या लडाख जिल्ह्यातील पूर्व भागात पसरलेली मारखा व्हॅली म्हणजे सातत्याने बदलणार्‍या वैविध्यपूर्ण निसर्ग दृश्यांचा एक चित्रपटच आहे. अतीशय दुर्गम आणि नैसर्गिक सौंदर्य जतन केलेली खेडी आणि तिबेटी बौध्दांची मंदिरे यांच्यामुळे या मारखा व्हॅलीच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. लेह भागामध्ये तसे अनेक ट्रेक आहेत. परंतु मारखा व्हॅली ही ट्रेकिंगसाठी सर्वात सोपी असल्यामुळे तिला ट्रेकर्स मंडळींकडून प्राधान्य दिले जाते. कोणाचेही लक्ष नसलेला एक पुरातन किल्ला मारखा या गावामध्ये आहे. त्याच्यावर अजून तरी कोणी आक्रमण केलेले नाही त्यामुळे त्याचे मूळ सौंदर्य कायम आहे.

Markha-Valley

रुंबाक आणि निमालिंग या दोन बर्‍यापैकी मोठ्या गावांच्या मध्ये हे गाव वसलेले आहे. या ट्रेकचा सर्वात उंच भाग म्हणजे कोंगमारू ला. मारखा व्हॅलीपर्यंत जाणे सोपे आहे. रुंबाक पार केले की ही व्हॅली लागते नंतर निमालिंग येते आणि निमालिंगच्या पल्याड कोंगामारू ला हे उंच शिखर आहे. रुंबाक हे ट्रेकर्ससाठी जेवढे सोपे आहे तेवढेच कोंगामारू अवघड आहे. मारखा व्हॅली हे नाव मारखा नदीवरून पडलेले आहे आणि मारखा ही झन्स्कार नदीची उपनदी आहे.

Markha-Valley1

मारखा व्हॅलीमध्ये लडाखच्या जुन्या संस्कृतीचे अवशेष अजूनही पहायला मिळतात. विशेषतः गढ्या आणि किल्ले यांच्यारुपाने त्या दिसतात. तसा हा परिसर उजाड वाटतो मात्र छोट्या छोट्या नाल्यांची पात्रे ओलांडत खूप चालल्यानंतर या थंड उजाड भागानंतर हिरवळीने भरलेली मारखा व्हॅली दिसायला लागते. बर्फाळ प्रदेशातील चिते आणि कोल्हे अधूनमधून दृष्टीस पडतात. कँग यात्से हा मारखा व्हॅलीचा शेवटचा भाग असून तो ४७०० मीटर उंच आहे. नंतर गँडाला हे शिखर लागते. ते ५२०० मीटर उंच आहे. या भागाचे ट्रेकिंग हेमीस मोनॅस्ट्री या बौध्द मंदिराजवळ संपते. तिथे हेमीस नॅशनल पार्क उभारण्यात आले आहे. मारखा व्हॅलीला अजून तरी महागड्या तारांकित हॉटेलांच्या सोयी उपलब्ध झालेल्या नाहीत. मात्र तिथे येणार्‍या पर्यटकांना लोकांच्या घरी राहण्याची सोय उपलब्ध होऊ शकते.

Leave a Comment