जम्मू – जम्मू- काश्मीरमधील किश्तवारमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचाराचे राजकारण करत भाजप तेथील परिस्थिती चिघळवण्याचे काम करत आहे, असा आरोप जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला. पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांवर डोळा ठेऊन भाजप राजकीय ध्रुवीकरण करत असल्याची टीका उमर यांनी केली.
भाजपने जातीय राजकारण करू नये- अब्दुला
किश्तवारमध्ये शुक्रवारी उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर प्रथमच उमर अब्दुल्ला यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. 2008 सालसारखी परिस्थिती बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता सांगितले. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणखी भडकावण्याचे काम न करता शांतता कायम राखण्यास भाजप नेत्यांनी मदत करावी असे, आपण लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज यांना दूरध्वनीवरून सांगितले असल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. काश्मीर खो-यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही पक्षाच्या नेत्यास या भागात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. किश्तवारकडे जाणारे भाजप नेते अरूण जेटली, खासदार अविनाश राय आणि भाजप प्रदेशाध्यक्ष जुगल किशोर यांना पोलिसांनी विमानतळावर ताब्यात घेऊन माघारी पाठवले. त्यावर ही लोकशाहीला पुरक घटना नाही, अशी टीका भाजपने केली.
तसेच हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी निघालेल्या पिपल डेमोक्रेटिक पक्षाच्या महबुबा मुफ्ती यांनाही श्रीनगर येथील घरात स्थानबद्ध करण्यात आले. तणावग्रस्त जम्मूमधील रोजौरी जिल्ह्यात शनिवारी रात्री हिंसाचार व जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर लष्कराला पाचाराण करण्यात आले. उधमपूर, सांबा आणि कठुआ या तीन जिल्ह्यात रविवारी संचारबंदी लावण्यात आली. या भागात लष्कराने ध्वजसंचालनही केले. जम्मूमधील दहा जिल्ह्यांपैकी सात जिल्हे हिंसाचारमुळे प्रभावित झाले आहेत. हिंसाचारग्रस्त किश्तवारमध्ये सलग तिस-या दिवशी संचारबंदी कायम ठेवण्यात आली.
