पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर कधी देणार? – मोदी

हैदराबाद – हैदराबाद रॅलीच्या निमित्ताने भाजपने मिशन 2014 च्या प्रचाराचा आज नारळ फोडला. तेलंगण राज्याची घोषणा झाल्यावर नरेंद्र मोदींची पहिली जाहीर सभा हैदराबाद मध्ये झाली. यात इंडिया फर्स्टचा नारा देत मोदींनी यूपीए सरकारवर हल्लाबोल केला. त्याचवेळी आंध्र, तेलंगण आणि तरुणांना कुरवाळताना एन.टी. रामाराव यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं आवाहनही केले.

नरेंद्र मोदींची हैदराबादमधली रॅली 5 रुपयांच्या तिकिटामुळे अगोदरच वादात होती. हे पैसे उत्तराखंडमधल्या प्रलयगस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचे भाजपने जाहीर केल्यावर विरोधकांचा आवाज बंद झाला होता. या पार्श्वभूमीवर मोदी काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. मात्र मोदींनी तेलुगू अस्मितेला कुरवाळताना थेट राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला हात घातला.

पाच भारतीय जवानांच्या हत्येचा हिशोब कधी चुकता करणार. पाकिस्तानला याचा जाब कधी विचारणार? पंतप्रधानांनी पाकिस्तानला जाब विचारू असं आश्वासन दिले होते आता पंतप्रधान आश्वासन का पाळत नाहीत? पाकिस्तानकडून होणार्‍या आक्रमणाचं उत्तर भारत देश कधी देणार असे प्रश्न उपस्थित करत मोदींनी किश्तवाड येथील हिंसाचारावर सुद्धा टिप्पणी केली. बांग्लादेश सिमेवरील घुसखोरी का थांबत नाही. चीन भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत आहे. चीनला जोरदार प्रत्युत्तर देण्याऐवजी भारत सरकारनं समझोता केला.

युपीए सरकरा व्होटबँकचे राजकारण करत असून व्होटबँकच्या राजकारणासाठी देशाची सुरक्षा टांगणीला लागली आहे, असा आरोप मोदींनी केला. या सभेत अनेक राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करून आपण पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याचे मोदींनी दाखवून दिलेच. त्याचवेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचे कौतुक करायला ते विसरले नाहीत. मोदींची ही बहुचर्चित सभा अनेक अर्थानं चर्चेत होती. मोदींच्या करिष्म्याचा भाजपला काय फायदा होईल तो होईल. मात्र या निमित्ताने त्यांनी कर्नाटकनंतर आंध्रमध्ये प्रवेश केला आहे.

Leave a Comment