चित्रपटाला दर्जा नसणे हे त्याला चित्रपटगृह न मिळण्याचे कारण – अमोल पालेकर

पुणे : चित्रपटगृह न मिळणे हा केवळ मराठी चित्रपटांचा प्रश्न नाही. तर धो-धो पैसा मिळवून न देणारा आणि मुख्य धारेत नसलेला चित्रपटाला सध्याच्या काळात येथे स्थान मिळणार का, हा खरा मुद्दा आहे. चित्रपट तयार करणाºयांना दृश्यकलेचे भान आल्याशिवाय प्रेक्षकही चांगल्या चित्रपटांकडे वळणार नाहीत. मात्र, सध्या चित्रपटाने जास्त पैसा कमविला म्हणजे तो चांगला, असे समीकरण तयार झाले आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केली.

साधना साप्ताहिकाच्या ६६व्या वर्धापनदिनानिमित्त ‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ या विशेषांकाचे प्रकाशन पालेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर ‘साधना’चे संपादक डॉ. नरेंद्र दाभोळकर, अभिनेत्री सोनाली कुलकणी, विवेक सावंत, संजय जोशी उपस्थित होते. यावेळी जोशी यांनी पालेकर यांच्याशी संवाद साधत चित्रपटसृष्टीत झालेल्या बदलांविषयी त्यांना बोलते केले.

पालेकर म्हणाले, महाराष्ट्राला कान तयार झाला पण दृष्टी लाभलीच नाही. अजुनही कलांचा आस्वाद श्राव्य पातळीवर होतो. केवळ संवादालाच टाळ्या पडतात. दृश्यकलेचे भान नसल्याने केवळ इतरांकडे पाहून आपण आपले विचार बदलत असतो. हे भाव निर्माण करण्यासाठी चित्रपट तयार करणाऱ्यानाही याचे भान असायला हवे. आज प्रेक्षकांना काही तरी वेगळे देण्याची क्षमता, धाडस आहे का, हा खरा प्रश्न आहे. १९६०-७० च्या दशकातील मुख्य धारेतील चित्रपटांसारखे चित्रपट आज खूप कमी बनतात. याचे खापर प्रेक्षकांवर फोडता कामा नये.

चित्रपटाची भाषा शोधण्याचा प्रयत्न त्यावेळी होत होता. जेव्हा प्रेक्षकांना काय हवे, हे कलाकृती तयार करणाऱ्याना कळेल तेव्हाच दोघांमधील अंतर कमी होवून कलाकृतीचा खऱ्या अर्थाने रसास्वाद घेता येईल. प्रेक्षकांना प्रभावित करून त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारा चित्रपट तयार व्हायला हवा, असे पालेकर म्हणाले. सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, काही गोष्टी आपण इतरांकडून शिकत असतो. चित्रपटांच्याबाबतीतही सोबतच्या माणसांमुळे आपले रसग्रहण बदलत जाते. यावेळी विवेक सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Comment